दोन बिबट्यांचा एकाचवेळी मृत्यू! वनविभागाच्या ‘झुंजी’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह; सत्य नेमके काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रांतर्गत चालठाणा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मध्ये दोन बिबट्यांचे मृतदेह एकाचवेळी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी वनरक्षक आर. के. राऊत हे वनमजुरांसह गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली. मात्र, एकाच ठिकाणी दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याने आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वनविभागाने २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शवविच्छेदनादरम्यान दोन्ही बिबट्यांचा मृत्यू आपापसातील झुंजीमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे नमूद केले आहे. दोन्ही बिबटे वन्यप्राणी अनुसूची एकमध्ये समाविष्ट असल्याने नियमानुसार नमुने गोळा करून न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर नियमानुसार मृतदेहांवर विल्हेवाटीची प्रक्रिया करण्यात आली.

मात्र, दोन बिबट्यांचा एकाचवेळी मृत्यू होणे ही साधी घटना आहे का?

दोन बिबटे एकमेकांशी झुंजले आणि दोघांचाही मृत्यू झाला, हा वनविभागाचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी या घटनेमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे. झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू होण्याइतकी परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली? दोन्ही बिबट्यांच्या शरीरावर नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या जखमा आढळल्या? मृत्यूची वेळ एकच होती का? घटनास्थळी इतर कोणते पुरावे आढळले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

विषबाधा, अन्य कारणे किंवा इतर कोणतीही शक्यता होती का?

सध्या कोणत्याही बाह्य कारणाचा ठोस पुरावा उपलब्ध नसताना अशा शक्यतांबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल काय सांगतो, याची माहिती सार्वजनिक होणे गरजेचे आहे. केवळ प्राथमिक अंदाजावर या प्रकरणाला पूर्णविराम मिळता कामा नये.  या प्रकरणाचा तपास मुख्य वनसंरक्षक अमरावती जयवंती बॅनर्जी, उपवनसंरक्षक बुलढाणा श्री जमीर शेख व संबंधित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे वनविभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाने या दुहेरी मृत्यूचे सत्य पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावे. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अंतिम अहवाल जाहीर करावा आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

दोन बिबट्यांचा मृत्यू ही केवळ वनविभागाच्या नोंदीतील एक घटना नसून वन्यजीवांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणे आवश्यक आहे. दोन बिबट्यांचा मृत्यू… वनविभागाचा झुंजीचा दावा… पण अंतिम सत्य कधी समोर येणार? हा प्रश्न आता अनुत्तरित आहे!

Comments are closed.