बिनधास्त खेळा, शार्दुलचा खेळाडूंना सल्ला
टी-20 मुंबई लीगमध्ये शार्दुल ठाकूरच्या ईगल ठाणे स्ट्रायकर्सने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर संघाला लय सापडल्याचे सांगत असताना त्याने नेतृत्वातील महत्त्वाचा गुणही सांगितला.
युवा खेळाडूंचे तोंडभरून कौतुक
‘संघात अनेक युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्यामुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. पहिल्याच सामन्यात त्यांनी आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. त्यांचा आत्मविश्वास आणि खेळ पाहून मलाही नवचैतन्य मिळाल्यासारखे वाटते,’ असे ठाकूर म्हणाला.
खेळाडूंना मैदानात पूर्ण स्वातंत्र्य
शार्दुल हिंदुस्थानकडून 85 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यामुळे त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्याने खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिल्याचेही स्पष्ट केले. तो म्हणाला की, ‘मी संघातील खेळाडूंना एकच गोष्ट सांगितली आहे की, मैदानावर उतरल्यावर कोणताही दबाव न घेता स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळा, मात्र संघहिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असेल.’
Comments are closed.