शेअर बाजार कोसळला,एका दिवसात गुंतवणूकदारांचे 500000 कोटी स्वाहा,बाजारात भूकंप कशामुळं?
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भूमिका बदलली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. त्यामुळं विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक शेअर विक्री करत काढून घेतली आहे. आठवड्याच्या कारभाराच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये शेअर विक्रीचा ट्रेंड पाहायला मिळाला. सलग सहाव्या आठवड्यात बाजारात नुकसान कायम राहिलं. सेन्सेक्स या आठवड्यात 742.12 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी घसरला. तर, एनएसई निफ्टीवर 202.05 अंकांची घसरण पाहायला मिळाली.
सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वर काय घडलं?
सेन्सेक्समध्ये 765.47 अंकांची घसरण झाल्यानं निर्देशांक मे महिन्यानंतर पहिल्यांदा 80 हजारांच्या खाली आला. सेन्सेक्स 79857.79 वर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 24363. वर बंद झाला. शुक्रवारी झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपये बुडाले.
जिओजीत इन्वेस्टमेंटस लिमिटेड रिसर्चचे प्रमुख विनोद नायर यांनी म्हटलं की भारताच्या निर्यातीवर अमेरिकेनं टॅरिफ लादल्यानं चिंता वाढल्यानं देशांतर्गत बाजारात घसरण पाहायला मिळाली. मे महिन्यानंतर प्रथम सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली आला आहे. नायर म्हणाले, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर विक्री सुरु ठेवल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वरील दबाव वाढला. रिअल्टी आणि मेटल सेग्मेंटमध्ये सर्वाधिक नुकसान झालं.
लेमन मार्केटस डेस्क चे विश्लेषक गौरव गर्ग यांनी म्हटलं की विदेशी संस्थात्मक गुंतणूकादारांकडून झालेली विक्री आणि टॅरिफच्या चिंतेमुळं शेअर बाजार घसरला आहे. वाद संपेपर्यंत कोणताही व्यापारी चर्चा होणार नाही या ट्रम्प यांच्या इशाऱ्यानं बाजारातील गुंतवणूकदारांवर परिणाम झाला, असं गर्गक म्हणाले. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री सुरु ठेवली आहे. शेअर बाजारावरील आकडेवारीनुसार गुरुवारी 4997.19 कोटी रुपयांची विक्री केली आहे. देशांतर्गत खरेदीदारांनी 10864.04 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
वाढत्या आर्थिक दबावादरम्यान पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर आल्यानं शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. गेल्या एक महिन्यात निफ्टी आयटी इंडेक्समध्ये 10 टक्के घसरण झाली आहे. बँक निफ्टीमध्ये देखील तेजी दिसून आली नाही. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.