शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी, शेअर बाजार का वधारला? जाणून घ्या प्रम
मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Share Market Update) आज तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं आज 500 अंकांची उसळी घेतली होती. तर, निफ्टी 50 नं 25000 चा टप्पा गाठला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराची शक्यता वाढल्यानं आणि जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळं गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 1.5 टक्के तेजी पाहायला मिळाली. तर, आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली.
शेअर बाजारातील तेजीची कारणं Share Market Rise Reason
भारत- अमेरिका अमेरिकेचा व्यापार करार
भारतीय शेअर बाजारातील तेजीचं प्रमुख कारण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध सुधारत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत म्हटलं की भारतासोबत व्यापारी कराराच्या मुद्यावर योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणत्या अडचणी नाहीत. येत्या काही दिवसात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे, असं ट्रम्प म्हणाले. तर, नरेंद्र मोदी यांनी देखील यामुळं भारत अमेरिका व्यापारी करार होण्याच्या शक्यता वाढण्यास मदत होईल असं म्हटलं. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वीके विजयकुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट आणि त्याला नरेंद्र मोदींचा सकारात्मक निर्णय हा शेअर बाजारासाठी सकारात्मक घटक असल्याचं म्हटलं.
मजबूत जागतिक संकेत
जागतिक बाजाराती तेजीमुळं भारतीय शेअर बाजाराला सपोर्ट मिळाला. आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाई कंपोजिट इंडेक्स आणि हाँगकाँगचा हँगसेंग मध्ये तेजी दिसून आली.
विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी 9 सप्टेंबरला भारतीय शेअर बाजारात 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खरेदी केली. सप्टेंबर महिन्यातील ही पहिली खरेदी होती.यापूर्वी विदेशी गुंतणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत होते.
आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी
भारतीय आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार खरेदी पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून संभाव्य व्याज दर कपातीच्या आशेमुळं ऑरकेल फायनान्शिअल सर्व्हिसेस, परसिस्टेंट सिस्टीम्स, एम फॅसिस, कोफोर्ज, विप्रोच्या स्टॉकमध्ये 9 टक्के वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांकात 2.5 टक्क्यांची वाढ झाली.
भारतीय रुपया आज अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी मजबूत होत 88.10 रुपयांवर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी आणि डॉलर कमजोर झाल्याचा फायदा झाला.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील आजचं कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 323.83 अंकांच्या तेजीसह 81425.15 अंकांवर पोहोचला. तर, निफ्टी 50 निर्देशांकात 104.50 अंकांची वाढ होऊन तो 24973.10 अंकांवर पोहोचला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.