सेन्सेक्स 1456 अंकांनी कोसळला, निफ्टी 23,400 च्या खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

शेअर मार्केट क्रॅश: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 105 डॉलरच्या पुढे गेल्याने आणि रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने बाजारात जोरदार विक्री झाली. यामुळे BSE Sensex तब्बल 1,456 अंकांनी कोसळला, तर Nifty 50 हा 23,400 च्या खाली बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक घट झाली.

निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारावर आयटी, रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रातील समभागांचा सर्वाधिक दबाव दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही मोठी घसरण नोंदवली गेली.

Crude Oil Prices : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी बाजाराला हादरा

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याने भारतासारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई, आयात खर्च आणि चालू खाते तुटीबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली.

Rupee Fall : रुपयाची विक्रमी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्याने परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला आणि विक्रीचा दबाव अधिक वाढला.

Sensex Closing : सेन्सेक्स 74,559 वर बंद

सेन्सेक्स 1456.04 अंकांनी म्हणजेच 1.92 टक्क्यांनी घसरून 74,559.24 वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान तो 74,449.50 या नीचांकी स्तरापर्यंत घसरला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 436.30 अंकांनी म्हणजेच 1.83 टक्क्यांनी घसरून 23,379.55 वर बंद झाला. इंट्राडेमध्ये तो 23,348.40 पर्यंत खाली आला होता.

Investor Wealth : गुंतवणूकदारांचे 10.22 लाख कोटी रुपये स्वाहा

11 मे 2026 रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 4,66,58,569 कोटी रुपये होते. ते 12 मे रोजी घसरून 4,56,99,945 कोटी रुपयांवर आले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 10,22,819 कोटी रुपयांची घट झाली.

Sectoral Impact : आयटी आणि रिअल्टी क्षेत्र सर्वाधिक दबावाखाली

आजच्या घसरणीत आयटी आणि रिअल्टी निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक कोसळले. ऑटो क्षेत्रात 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही अनुक्रमे 2 आणि 3 टक्क्यांची पडझड झाली.

बीएसईवर एकूण 4410 समभागांमध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 869 समभाग वाढले, तर 3412 समभाग घसरले. 93 समभागांनी एका वर्षातील उच्चांक गाठला, तर 45 समभाग वर्षातील नीचांकी स्तरावर पोहोचले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ State Bank of India चा समभाग वाढीसह बंद झाला. तर Tech Mahindra मध्ये सर्वाधिक घसरण झाली.

Share Market Outlook : पुढील काही दिवस अस्थिरतेची शक्यता

कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची हालचाल आणि जागतिक तणाव यामुळे आगामी सत्रांमध्येही बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेऊन दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.