शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराण सोबतचा शांतता करार संपल्याचं जाहीर केलं. याशिवाय ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडींमुळं भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. क्रूड ऑईलचे दर वाढले होते. भारतीय शेअर बाजारात काल गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले होते. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. पहिल्या तिमाहाच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी दिसून आली.

सेन्सेक्स आज 238 अंकांच्या तेजीसह 76741.82 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 81 अंकांच्या तेजीसह 23962.80 अंकांवर बंद झाला. आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वधारले.

शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांनी 5 लाख कोटी रुपयांची कमाई केली. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471.2 लाख कोटींवरुन वाढून 476.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच काल 8 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करणाऱ्या गुंतवणूकदारांना आज थोडा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 5 लाखक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, भारतीय एअरटेल, सन फार्माच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर, इन्फोसिस, एक्सिस बँक आणि मारुतीच्या शेअरमध्ये घसरण झाली. जागतिक घडामोडी आणि कंपन्यांचे पहिल्या तिमाहीमधील निकाल याकडे सर्वांचं लक्ष गालं आहे. टीसीएस कंपनीकडून लवकरच पहिल्या तिमाहीचे अंदाज जाहीर केले जाणार आहेत.

निफ्टी 50 वर आज 33 शेअरमध्ये तेजी दिसून आली तर 17 शेअर घसरणीसह बंद झाले.निफ्टीवर सन फार्मा, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व, इंटरग्लोब एविएशन आणि इटरनलच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर, दुसरीकडे डॉ. रेडीज, मारुती, ओएनजीसी आणि एन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

Comments are closed.