अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली होती. आज ट्रेडिंग सुरु झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 750 अकांची तेजी दिसून आली होती. तर, निफ्टीनं 25400 चा टप्पा पार केला होता. शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे.  जागतिक पातळीवरील राजकारणातील आणि आर्थिक तणाव कमी झाल्यानं बाजाराला दिलासा मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नरमाईनं जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाले, याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

सेन्सेक्सनं आज ट्रेडिंग दरम्यान 773 अंकांची उसळी घेतली होती. तर, निफ्टीमध्ये देखील 245.35 अंकांची उसळी पाहायला मिळाली होती. अनेक दिवसांनंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये पुन्हा जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदललेल्या भूमिकेचा फायदा

भारतातील शेअर बाजारातील तेजीचं कारण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड आणि यूरोप संदर्भातील बदललेली भूमिका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्पष्ट केलं होतं की ते ग्रीनलँडला नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याचा वापर करणार नाहीत. याशिवाय यूरोपियन देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला देखील ट्रम्प यांनी लांबणीवर टाकलं आहे.  ट्रम्प यांनी दावोसमध्ये नाटोचे महासचिव मार्क रुटे यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ग्रीनलँडच्या भविष्यासंदर्भात एक आराखडा ठेवल्याचं सांगितलं.

जिओजित इन्व्सेस्टमेंटचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वीके विजयकुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही जुनी शैली असल्याचं म्हटलं. अमेरिकेनं यूरोपवर टॅरिफ लादण्याचा निर्णय टाळल्यानं अमेरिका आणि यूरोप यांच्यातील ट्रेड वॉरचा धोका टळला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये  शेअर बाजारातील घसरणीचं हे प्रमुख कारण होतं.

भारत आणि अमेरिका व्यापार कराराची शक्यता वाढली

भारतीय शेअर बाजारातील तेजीचं प्रमुख कारण भारत आणि अमेरिकेतली व्यापार कराराच्या शक्यता वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये अमेरिका लवकरच भारतासोबत चांगला करार करणार असल्याचं म्हटलं. यामुळं दोन्ही देशातील व्यापार करार सकारात्मक दिशेनं असल्याचे संकेत मिळाले.

जागतिक बाजारातून सपोर्ट

अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याचं पाहायला मिळाली. अमेरिकन शेअर बाजारात सकारात्मक संकेत पाहायला मिळाले आहेत. आशियाई बाजारात जोखीम घेण्याची भावना सुधारली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. जागतिक स्तरावर जोखीम कमी झाल्यानं आणि अनिश्चितता  कमी झाल्यानं गुंतवणूकदारांनी इक्विटीला प्राधान्य दिलं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.