विदेशी गुंतवणूकदारांनी रणनीती बदलली, शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्याचा विचार केला असता घसरणीसह बंद झाले. याचं एक कारण समोर आलं आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारंनी ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक कायम ठेवली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरु करण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारातील शेअरची विक्री करुन गुंतवणूकदारांनी चार दिवसात 12569 कोटी रुपये काढून घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोर संकेत आणि जोखमीपासून वाचण्याच्या उद्देशानं एफपीआयनं पैसे काढून घेतल्याचं म्हटलं जातंय.
FPI Sell Stake in Indian Market : विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र
ऑक्टोबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारंनी भारतीय बाजारात 14610 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एफपीआयनं जुलै मध्ये भारतीय शेअर बाजारातून 17700 कोटी रुपये काढून घेतले होते. ऑगस्ट महिन्यात 34990 कोटी रुपये तर सप्टेंबर महिन्यात 23885 कोटी रुपये काढून घेतले होते.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयकुमार यांच्या अनुसार एफपीआय भारतीय बाजारातील त्यांची भागीदारी विकत असून अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या बाजारात गुंतवणूक करत आहेत.
अँजलवन चे वरिष्ठ फंडामेंटल विश्लेषक वकार जावेद खान यांच्या मते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून टेक शेअरमध्ये जागतिक विक्री पाहता भारतीय शेअरची विक्री करत 12569 कोटी रुपये काढून घेतले. भारतीय कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. मिडकॅप सेक्टरनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, जागतिक आव्हानांमुळं एफपीआय जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाहीत.
डेब्ट मार्केटमधून देखील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1758 कोटी रुपये काढून घेतले. त्याचवेळी व्हीआरआय मार्फत 1416 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.5 ट्रिलियन हून अधिक रक्कम काढून घेतली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.