सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेल्या विक्रीमुळं भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये 120 अंकांची घसरण झाली. तर, एनएसईवर निफ्टी 50 मध्ये 42 अंकांची घसरण झाली. बीएसईवरील 30 कंपन्यांचा निर्देशांक सेन्सेक्स 120.21 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरुण 84559.65 अंकांवर बंद झाला. आज बाजार सुरु असताना सेन्सेक्समध्ये 263.88 अंकांची घसरण होऊन तो 84415.98 अंकांपर्यंत पोहोचला होता, त्यानंतर सेन्सेक्समध्ये थोडी सुधारणा झाली आहे. एनएसईवर निफ्टी 50 निर्देशांक 41.55 अंकांच्या घसरणीसह 25818.55 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं तब्बल 1.6 लाख कोटी रुपयांचं नुकसान एकाच दिवसात झालं.
Share Market Update : सेन्सेक्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण
सेन्सेक्सवरील कंपन्या ट्रेंट, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टायटन आणि एशियन पेंटसच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर, दुसरीकडे भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, एक्सिस बँक आणि मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मंगळवारी 2381.92 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करण्यात आली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1077.48 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
एकीकडे भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद होत असताना आशियातील इतर बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळतेय. दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा बाजार तेजीसह बंद झाला. अमेरिकेमधील बहुतांश बाजार मंगळवारी घसरणीसह बंद झाले. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल2.12 टक्क्यांनी वाढून 60.17 डॉलर प्रति बॅरल झालं आहे. मंगळवारी सेन्सेक्स 533.50 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टी 167.20 अंकांनी घसरला होता. त्या तुलनेत बुधवारी कमी प्रमाणात घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी बुडाले
अमेरिकन रोजगारांचे संमिश्र आकडे, विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली विक्री, कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि रुपया कमजोर झाल्यानं देशांतर्गत बाजारात नफा वसूल करण्याचा ट्रेंड वाढला. यामुळं शेअर बाजार सकाळी तेजीत होता मात्र, नंतर त्यात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.व्यापकपणे पाहिलं असता मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअरवर विक्रीचा दबाव होता.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.6 लाख कोटी रुपयांनी घटलं आहे. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 1.6 लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.