सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
आज शेअर बाजार मुंबई : भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी दिसून आली. सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला तर निफ्टी 50 नं 25650 अंकांचा टप्पा गाठला. संमिश्र जागितक संकेतांमुळं बाजाराची सुरुवात कमजोर झाली होती. दुसरीकडे निफ्टी 50 देखील 25400 च्या खाली आला होता. मात्र, पहिल्याच तासात शेअर बाजारात खरेदीचा ट्रेंड सुरु झाला आणि बाजारात सकारात्मक चित्र पाहायला मिळालं.
भारतीय शेअर बाजारात ऊर्जा, रिअल्टी आणि फायनान्शिअल शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. या बळावर निफ्टी 25700 अकांच्या पार पोहोचला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 650.39 अंकांनी वाढून 83277.15 वर बंद झाला. निफ्टी 50 देखील 211.65 अंकांच्या तेजीसह 25682.75 वर बंद झाला आहे.
Share Market Update : गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
पीएसयू बँक, रिअल्टी, प्रायव्हेट बँक, इन्फ्रा, कॅपिटल गुडस आणि ऊर्जा या सेक्टोरल निर्देशांकात 1 ते 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. मीडिया आणि ऑटो निर्देशांकात 0.5 ते 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिशाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला. तर, स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाला. लार्ज कॅप शेअरची कामगिरी या दोन्हीच्या तुलनेत चांगली राहिली.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 465.46 लाख कोटींवरुन 468.47 लाख कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच आज बीएसईवरील लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 3.01 लाख कोटींनी वाढलं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीमुळं नुकसान सहन करावं लागलेल्या गुंतवणूदारांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला.
बीएसई सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या टॉप 30 पैकी 20 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. यात पॉवर ग्रीडच्या स्टॉकमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.तर, सर्वाधिक घसरण टेक महिंद्राच्या शेअरमध्ये झाली. क्वालिटी वॉल्स, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, ट्रेंटच्या शेअरमध्ये घसरण झाली.
बीएसईवर आज एकूण 4496 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1793 शेअर तेजीसह बंद झाले. तर 2510 शेअरमध्ये घसरण दिसून आली. 193 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. 106 स्टॉकनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि 211 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.