माझ्या रक्तामध्येच संघर्ष, मला मृत्यूची भीती नाही; फाशीच्या शिक्षेनंतरही शेख हसीना यांचा बांगलादेशला परतण्याचा निर्णय
बांगलादेशमधून हकालपट्टी झाल्यानंतर हिंदुस्थानात आश्रय घेतलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या मायदेशी परतण्याबाबत मोठे विधान केले आहे. बांगलादेशच्या विशेष न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली असतानाही मी याच वर्षी माझ्या देशात परत जाईन, असे त्या म्हणाल्या आहेत. जुलै 2024 मधील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या क्रूर कारवाईप्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेख हसीना यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली.
माझ्याविरुद्ध आलेला निकाल हा न्याय नाही, तर तो पूर्णपणे बेकायदेशीर, असंवैधानिक आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझ्या पक्षाला अवामी लीगला नेतृत्वहीन करण्यासाठी सध्याच्या अंतरिम सरकारने न्यायव्यवस्थेचा वापर राजकीय सूडबुद्धीचे साधन म्हणून केला आहे. असे अनेक कट यापूर्वीही रचले गेले, पण ते पूर्वीही अपयशी ठरले आणि आताही अपयशी ठरतील, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या कुटुंबाच्या ऐतिहासिक त्यागाची आठवण करून देत शेख हसीना म्हणाल्या, 1975 मध्ये मी माझे आई-वडील, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब गमावले. त्यानंतर 2004 मध्येही माझ्यावर भीषण ग्रेनेड हल्ला झाला. त्यामुळे मला मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. देशाच्या जनतेने मला पाच वेळा पंतप्रधान म्हणून निवडून दिले आणि मी बांगलादेशच्या अभूर्व विकासासाठी आयुष्य वेचले आहे. प्रत्येक अडथळा आणि कारस्थान पार करून मी या वर्षी बांगलादेशात पाय ठेवेन, असा हुंकार शेख हसीना यांनी भरला. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
दरम्यान, बांगलादेशातील विशेष न्यायालयाने शेख हसीना यांच्यावर अत्यंत गंभीर ठपका ठेवला आहे. जुलै 2024 मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात संयुक्त राष्ट्रांच्या दाजानुसार सुमारे 1400 नागरिकांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने नोंदवलेल्या पाच प्रमुख गुन्ह्यांमध्ये असे म्हटले आहे की, शेख हसीना यांनीच निदर्शकांवर ड्रोन, हेलिकॉप्टर आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे ढाका परिसरात मोठ्या प्रमाणावर सामूहिक नरसंहार झाला.
Comments are closed.