शिवसेनाप्रमुखांचा उद्या स्मृतिदिन, शक्तिस्थळावर अभिवादनासाठी लोटणार जनसागर
लाखो शिवसैनिकांच्या हृदयात अढळ स्थान असलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी 14 वा स्मृतिदिन. यानिमित्ताने लाडक्या साहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर जनसागर लोटणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी शिवतीर्थ पुन्हा एकदा भारावून जाणार आहे. शिवतेजाचा जागर होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेते नव्हते, तर लाखो मराठी माणसांचा आवाज होते. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्यातून आणि धारदार शब्दांतून मराठी माणसाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. हिंदुत्वाचा विचार घराघरात पोहोचवला. त्यांच्या एका हाकेवर लाखो लोक रस्त्यावर उतरायचे. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द शिवसैनिकांसाठी ऊर्जा ठरायचा.
आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने देशाचे समाजकारण व राजकारणात युग निर्माण करणाऱया बाळासाहेबांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले, मात्र त्यांचे विचार आणि आठवणी आजही शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत. साहेबांचे नाव घेताच आजही अनेकांचे डोळे पाणावतात. त्यांच्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी हजारो शिवसैनिक येतात. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध पक्षांच्या नेत्यांचाही यात समावेश असतो. यंदाही मोठय़ा संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर येणार आहेत.
सकाळी 7 वाजल्यापासून दर्शन
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शक्तिस्थळावर आकर्षक आणि सुगंधी फुलांची सजावट करण्यात येत आहे. या ठिकाणच्या हिरवळीचीही डागडुजी करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर दर्शनाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महापालिका व पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी
शिवतीर्थावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलीस, महापालिका आणि शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. शिवसैनिकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेची व्यवस्था केली जात आहे. स्वच्छतेची व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात येणार आहेत. पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Comments are closed.