शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त जाणीवोत्सव – दक्षिण मुंबईत आज आणि उद्या शिवसेनेचा क्रीडा महोत्सव, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईत एकाच वेळी बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन थरार रंगणार आहे. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून आणि जाणीव न्यासाच्या माध्यमातून आयोजित ‘जन्मशताब्दी जाणीवोत्सव’अंतर्गत 11 व 12 जुलै रोजी भव्य क्रीडा महोत्सव होणार असून, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल.
या महोत्सवात बुद्धिबळाच्या पटावर बुद्धीची चकमक, कॅरम बोर्डवर स्ट्रायकरचा सणसणीत प्रहार, टेबल टेनिसमध्ये वेगाचा धडाका आणि बॅडमिंटन कोर्टवर स्मॅशचा तडाखा असा चौफेर क्रीडाजल्लोष दोन दिवस दक्षिण मुंबईत उसळणार आहे. बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा काळाचौकीतील अभ्युदय नगर समाज मंदिर वातानुकूलित हॉलमध्ये खेळल्या जातील, तर टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा मरीनलाईन्स येथील युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पॅव्हेलियनमध्ये रंगतील.
सर्व स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असून विजेत्यांवर रोख पारितोषिके आणि आकर्षक चषकांचा वर्षाव होणार आहे. या स्पर्धांचे संयोजन मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, यो यो ग्रुप, मुंबई जिल्हा कॅरम संघटना, बृहन्मुंबई बॅडमिंटन संघटना या नामांकित क्रीडा संघटनांच्या सहकार्याने केले जात असून, या महोत्सवाच्या अभूतपूर्व आयोजनासाठी शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. ‘मैदानात उतरा, कौशल्य दाखवा आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला क्रीडाशक्तीची मानवंदना द्या,’ असे आवाहन अरविंद सावंत यांनी खेळाडूंना केले आहे.
Comments are closed.