रायते पुलावरील अपघात; मृत्यू झालेल्या तीन भावंडांच्या कुटुंबियांना शिवसेनेने दिला धीर, सुनील शिंदे यांच्याकडून सांत्वन
दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या रायते पुलावर प्रवाशी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात मुरबाड परहे गावच्या एकाच कुटुंबातील स्नेहा मोहपे (22), मानसी मोहपे (20) आणि प्रथमेश मोहपे (17) हे तिघेही मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मुरबाड येथे जाऊन मोहपे कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
सुनील शिंदे यांनी गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. परिसरातील बेशिस्त परिवहन सेवा, खराब रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी याचा आढावा घेतला. घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच मोहपे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन या वेळी आमदार शिंदे यांनी दिले. या कठीण प्रसंगात शिवसेना तुमच्या सोबत ठामपणे उभी आहे, अशी ग्वाही देत मोहपे कुटुंबियांना धीर दिला. या वेळी उपजिल्हाप्रमुख आप्पा गुंठे, तालुकाप्रमुख संतोष विशे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पंठे, कल्याण शहरप्रमुख बाळा परब, केडीएमसी नगरसेवक विशाल गारवे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आईवर दुःखाचा डोंगर

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई अंजना मोहपे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही घरकाम करून मुलांचे संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. त्या परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे काम करत होत्या. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने या तिन्ही लेकरांच्या डोळ्यांत होती. मात्र एका क्षणात ही सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments are closed.