शिवसेनेचे आज रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार शंखनाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रभू श्रीरामाच्या नावावर अमर्याद सत्ता भोगणाऱया भाजपच्या राजवटीतच अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा पडल्यामुळे देशभरात तीव्र संताप आहे. राम मंदिराच्या या लुटीचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेनेने ‘रामरक्षा’ आंदोलन पुकारले असून मुंबईतील दादर कबुतरखान्याजवळच्या ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर उद्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हिंदुत्वाचा बुरखा घालून काही लोक राम मंदिर लुटत आहेत, देशद्रोह करत आहेत. अशा लोकांना आता हिंदू माफ करणार नाहीत. या गुन्हेगारांना व त्यांना पाठीशी घालणाऱयांना उत्तर द्यावेच लागेल, असे ठणकावत, उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनामुळे रामभक्तांमध्ये चैतन्य पसरले असून रविवारच्या आंदोलनाला रामभक्तांची मोठी गर्दी उसळणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सामील व्हा… समस्त हिंदूंना आवाहन

राम मंदिरातील चोरीमुळे तमाम रामभक्तांमध्ये विश्वासघात झाल्याची आणि अस्वस्थतेची भावना आहे. रामभक्तांच्या या अस्वस्थतेला शिवसेनेच्या आंदोलनातून वाट मिळणार आहे. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र व देशातील समस्त हिंदू आणि रामभक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे. उत्तर हिंदुस्थानींनीही ‘जय शिवराय… जय श्रीराम’ म्हणत आंदोलनात उतरावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

महाआरती आणि हनुमान चालिसा पठण

दादरच्या पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरासमोर रविवारी सायंकाळी 4 वाजता महाआरती होणार आहे. यावेळी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठणही केले जाणार आहे. हे आंदोलन पुढे राज्यभर केले जाणार आहे. जिथे जिथे राम मंदिर आणि हनुमान मंदिर आहे त्या प्रत्येक गावात महाआरती, रामरक्षा व हनुमान चालिसा पठण करून राम मंदिरातील चोरीचा निषेध केला जाणार आहे.

स्थळ – हनुमान मंदिर, दादर कबुतरखाना
वेळ – सायंकाळी 4 वाजता

Comments are closed.