तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी मार्चमधून ललकारलं

उद्धव ठाकरे: दिल्लीमध्ये जंतरमंतरवर कॉंकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार आंदोलनं होत आहेत. आज शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा जनसागर उसळला. शिवसेना ठाकरे गटाकडून तिरंगा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्कवरती तरुणाई एकवटली होती. या मोर्चामध्ये संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारलं.

पण आमच्या हातामध्ये तिरंगा

उद्धव ठाकरे म्हणाले की, “या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तुमच्यासमोर तिरंगा घेऊन आहोत. बघतो तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही,” अशा शब्दांमध्ये ललकारलं. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेधुंद पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीहल्ला करण्यात आला, अश्रुधूर वापरण्यात आला, त्यावर मी सरकारला इशारा देतोय की, “तुमच्या हातामध्ये बंदुका असतील, तुमच्या हातामध्ये लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये तिरंगा असल्याचं” उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

तुषार गांधी सुद्धा तिरंगा मोर्चात सामील

दरम्यान, या आंदोलनाला विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मोठी गर्दी या तिरंगा मार्चसाठी झाली होती. या मोर्चासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, शर्मिला ठाकरे असे नेते ही सुद्धा उपस्थित होते. तुषार गांधी सुद्धा तिरंगा मोर्चात सामील झाले. दरम्यान, अशाच पद्धतीने 26 जुलैला तिरंगा मार्च काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघणारा हा मोर्चा सिद्धिविनायकापर्यंत पोहोचेल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण होणार नाही, कोणताही राजकीय फलक नसेल, कुठलेही पॉलिटिकल बॅनर नसतील, फक्त आपण देशभक्तीसाठी तिरंगा पुढे घेऊन चाललो असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.