यंग भारत कबड्डीवर शिवनेरीचा झेंडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यश चोरगेच्या तुफानी चढायांच्या जोरावर शिवनेरी सेवा मंडळाने थरारक अंतिम सामन्यात बॉस्को स्पोर्ट्स अॅकॅडमीचा 37-34 असा पराभव केला आणि यंग भारत सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुमार गट कबड्डी स्पर्धेवर आपला झेंडा फडकावला.

शिवनेरीच्या यशने आपल्या जोरदार चढायांनी अंतिम सामनाही गाजवला. त्याने वेगवान चढाया करत मध्यंतरालाच शिवनेरीकडे 25-16 अशी आघाडी ठेवली. त्यामुळे पूर्ण सामन्यावर त्यांचेच वर्चस्व राहिले, परंतु शेवटच्या क्षणी बॉस्कोने भन्नाट खेळ करत सामन्यात जान आणली. एक मिनिट असताना त्यांनी शिवनेरीवर लोणही चढवला. तरीही ते जेतेपदापासून 3 गुणांनी मागे राहिले आणि शिवनेरीने स्पर्धा जिंकली.

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी क्रीडा नगरीत सुरू असलेल्या कबड्डीच्या संघर्षात आज कबड्डीप्रेमींना थरारक उपांत्य सामन्यांचा अनुभव घेता आला.  शिवनेरी सेवा मंडळ आणि अमर क्रीडा मंडळ यांच्यातील बरोबरीत सुरू असलेला सामना शेवटच्या क्षणी शिवनेरीने जिंकला. मध्यंतराला 18-18 असा स्कोअर होता. मात्र त्यानंतर यश चोरगे, हर्ष कदम आणि नीलेश ठोंबरे यांच्या वेगवान खेळांनी शिवनेरीला 28-19 अशी आघाडी मिळवून दिली, पण शेवटची पाच मिनिटे असताना अमर क्रीडा मंडळाने लोण चढवत सामन्यात पुनरागमन केले. तरीही त्यांचा संघर्ष संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि शिवनेरीने 37-35 अशा निसटत्या विजयासह अंतिम फेरी गाठली. तसेच दुसऱया उपांत्य सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने जोरदार खेळ करताना बॉस्को स्पोर्ट्स अॅकॅडमीविरुद्ध 18-12 अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात बॉस्कोने चढाई-पकडींचा सुसाट खेळ करत सामना फिरवला आणि 22 गुणांची कमाई करत 34-28 अशा फरकाने लढतही जिंकली.

Comments are closed.