काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्व
शिवराज पाटील यांचे निधन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Passes Away) यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
कोण होते शिवराज पाटील चाकूरकर? (Shivraj Patil Passes Away)
भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.
१९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत. सून डॉ अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहे..दोन नाती आहेत.शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित आहेत. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जातात.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.