महापालिकेत वडिलांची दोन दशक चपराशी म्हणून सेवा; त्याच महापालिकेत लेकाला नगरसेवक होण्याची संधी

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : नागपूरच्या प्रभाग 31 म्हणजेच रेशिमबाग प्रभागातून अति सामान्य कुटुंबातील गणेश चर्लेवार (Ganesh Charlewar) या अनुसूचित जातीच्या स्वंयसेवकाला महायुतीची (BJP-Shiv Sena Alliance) उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून भाजपने या दलित स्वयंसेवकाला रिंगणात उतरविले आहे. विशेष म्हणजे गणेशचे वडील महापालिकेत चपराशी असून त्याच महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी त्यांच्या मुलाला चालून आली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) अत्यंत महत्त्वाचे स्थान डॉ.हेडगेवार स्मृती भवन परिसर नागपूर महापालिकेच्या (Nagpur Election 2025) याच प्रभाग 31 (रेशीमबाग प्रभाग) अंतर्गत येतं. शिवाय रेशीमबाग परिसरात मोठ्या संख्येने संघाचे स्वयंसेवकांचे निवासही आहे. त्यामुळे अशा अत्यंत महत्वाच्या रेशीमबाग प्रभागातून शिवसेना-भाजप युतीकडून एका अनुसूचित जातीच्या तरुण स्वयंसेवकाला देण्यात आलेली उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Nagpur BJP : कधी सिक्युरिटी गार्ड, तर कधी केबल बॉय म्हणून काम, 28 वर्ष कार्यकर्ता म्हणून सातत्याने सक्रीय

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या गणेश कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असताना शिक्षण घेताना त्याने कधी सिक्युरिटी गार्ड, तर कधी केबल बॉय म्हणून काम केले. मात्र वयाच्या सहाव्या वर्षापासून गेले 28 वर्ष गणेश सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रीय स्वयंसेवक म्हणून काम करतो आहे. गेले 22 वर्ष गणेशने रेशीमबाग भागात भाजपचा बुथ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणूक होत असताना संघाच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी गणेशसारख्या तरुणांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सल्लामसलत करत शिवसेनेच्या कोट्यातून अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या रेशीमबाग प्रभागातून या स्वयसेवकाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महापालिकेत चपराशी असलेल्याचा मुलगा खरच महापालिकेत नगरसेवक बनेल का? अशी चर्चा सध्या रेशिमबाग भागात आहे.

Nagpur Election 2025 : गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय

महापालिकेत गेले दोन दशक चपराशी म्हणून नोकरी करणाऱ्याच्या मुलाला त्याच महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी देण्यात आली आहे. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रेशीमबाग प्रभागात भाजप शिवसेना युतीकडून गणेश चर्लेवार या अनुसूचित जातीच्या आणि अत्यंत गरीब तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामीव्हीव्हीआयपी नेत्यांच्या कुटुंबातील पॅराशुट उमेदवारांच्या या काळात गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.