नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. कारण, शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती, त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये, नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे आज मराठी (एकनाथ शिंदे) दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली.
एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले असून अमित शाह यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, बिहार इथे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे, बिहारमधील एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती आहे.
नाराजीच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस-अजित पवारांची बैठक
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याच कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदेंची वाढती नाराजी दूर कशी करायची, याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा पार पडली. एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच तर पुढं काय करायचं याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, महायुतीतमध्ये तीन पक्षात आलबेल नसल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, आमच्यात कुठलीही नाराजी नाही, कुंटुंब म्हटल्यावर थोडं फार होतच असतं, असे स्पष्टीकरण शिवसेना मंत्री तथा नेते प्रताप सरनाईक यांनी नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले होते. तर, एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या चर्चांवर बोलणे टाळले होते.
प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण
कुटुंबात वाद विवाद होत राहतात मनातली भावना व्यक्त करायची असते. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुका सुरू आहेत, पक्ष प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे, कुणीही महायुतीमधील नेते, पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत अशी चर्चा झाली. महायुतीमधील एकमेकांचे नेते, आमदार, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत असं तिन्ही पक्षानी ठरवलं आहे. उद्यापासुन याची अमलबजावणी होईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
आणखी वाचा
Comments are closed.