बारामतीत जय वि. युगेंद्र लढणार की रोहित पवारच मैदानात उतरणार? श्रीनिवास पवार म्हणाले….

बारामती: बारामतीत 2029 ला पवार विरूध्द पवार ( Pawar VS  Pawar) अशी निवडणूक रंगणार का? याबाबत अजित पवारांचे बंधू आणि आमदार रोहित पवारांचे वडिल श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार आणि जय पवार यांच्या दोघांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसा बघता या प्रश्नावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, मी खरंतर दोघांचंही वक्तव्य ऐकलेलं नाही. दोघेही तरुण आहेत, त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत, रोहितचं मत आहे, जयचं मत आहे, त्याची इच्छा आहे, दादा म्हणायचे की जय नको याच्यामध्ये पडू हे चांगलं नाही, लोकांचं बघून बघून त्याची इच्छा तयार झाली असेल. शेवटी त्याच्यात काही चूक नाही. तो दादांचा मुलगा आहे, बहुतेक 2029 ला वहिनी माघार घेतील आणि जय येईल असं दिसतंय, असं श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) म्हणालेत.

Shriniwas Pawar Baramati : त्यावेळी कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल…

तर रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, जय पवार उभे राहणार असतील तर इथे बारामती पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा होऊ शकतो? या प्रश्नावर बोलताना, श्रीनिवास पवार म्हणाले त्यावेळी कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार? कोण कोणाच्या विरोधात लढणार? युती होणार, नाही होणार, विलीनीकरण होणार, नाही होणार, तीन वर्ष हा खूप मोठा काळ आहे, आता त्याच्यावर भाष्य करणं मलाही योग्य वाटत नाही.

Shriniwas Pawar Baramati : तेव्हा पवार साहेब जे काही सांगतील….

रोहित पवार म्हणालेत की युगेंद्र पवार देखील जय पवारांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात, यावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, तेव्हा पवार साहेब जे काही सांगतील, त्यांचा पक्ष जो काही निर्णय घेईल, त्यांचा पक्ष जो सांगेल, कारण युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत. जय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यांची विलीनीकरण होण्याची प्रक्रिया सुरू होती, जे काय हे होतं, ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ते सगळं थांबलेलं दिसत आहे, आता दोघांचे वेगवेगळी काम सुरू आहेत, आता तसं काही होणार नाही, असं नाही, तेव्हा 2029 ला काय होईल ते पाहता येईल.

Shriniwas Pawar Baramati : सर्व राजकीय निर्णय तो घेणार

मी वडील आहे पण निर्णय तो घेईल, ही नवीन पिढी आहे. सर्व राजकीय निर्णय तो (रोहित पवार) घेणार, नवीन पिढीला वडिलांचे विचार घेईल हे जरुरी नाही. साहेबांनी जर ठरवलं, तेव्हा पक्षातर्फे कोणाला उभं करायचं तेच फायनल होईल, असंही पुढे श्रीनिवास पवार म्हणालेत.

Shriniwas Pawar Baramati : दादा दादा होता शेवटी, तो पार्टी कंट्रोल करू शकत होता

अजित पवारांच्या हयातीत असताना खास करून त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विलीनीकरणाच्या खूप चर्चा सुरू होत्या, ते स्वतः आग्रही होते, असं बऱ्याच लोकांनी सांगितलं, मग हे विलीनीकरण कुठे थांबलं आहे, यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, मला असं वाटतं परिस्थिती बदलली. दादा दादा होता शेवटी, तो पार्टी कंट्रोल करू शकत होता, आता दादानंतर मुलं लहान आहेत, वहिनी नवीन आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षातील जे काही बाकीचे सीनियर लीडर आहेत, ते काही मध्ये बोलत असतील. करायचं, नाही करायचं. तेव्हा निर्णय घेणारे दादा होते, दादा एकटे निर्णय घेणारे होते, तो फक्त पार्टीचा विचार घ्यायचा, त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं, आता सगळ्यांच्या विचाराने सुरू आहे, अजून दादाला जाऊन पण तीन महिने झालेले नाहीत. त्यांच्या पक्षातील एकदा सेटल झाले, सगळ्या गोष्टींमधून हा सगळा मोठा धक्का आहे, कुटुंब म्हणून इतकी उलथा पालथ झालेली, की पार्थ खासदार झाला, वहिनी आता आमदार होतील, उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सगळं समजायला वेळ जाईल. मग एखाद्या वेळेस त्यांचे विचार परत दादांसारखे होतील, नाही होती, ते आता काळच ठरवेल असंही पुढे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

Shriniwas Pawar Baramati : शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नव्हतं की दादा अचानक जाईल

2029च्या निवडणुकीबाबत जय पवार आणि रोहित पवार यांची वक्तव्य आजच्या दिवशी येणं, याबाबत बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, तीन वर्ष खूप मोठा काळ आहे. त्यामध्ये बरीच उलथा पालथ होऊ शकते, जसे जानेवारीमध्ये घडलं की शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नव्हतं की दादा अचानक जाईल आणि असं काहीतरी होईल, त्यामुळे राजकारणातही सांगता येत नाही. त्यामुळे ते दोघं काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती, किंवा त्यांच्या मनात पण इच्छा तयार झालेली असेल, म्हणून बोलले असतील असं पण मला वाटतं, असंही पुढे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

Shriniwas Pawar Baramati : तर पवारांनी एकत्र बसून समजूतीने घ्यायला हरकत नाही

पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामती व्हावा असं बारामतीकरांना वाटत नाही, असेही रोहित पवार म्हणालेत, मात्र भाजपला वाटतं, यावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, जर तुम्हाला माहिती आहे, लोकांची इच्छा नाहीये, तर पवारांनी एकत्र बसून समजूतीने घ्यायला हरकत नाही, भाजपाला दोष देऊन काय उपयोग आहे, तुम्हाला जर कळत आहे की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघत आहे, तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करत आहात आत्ताही, तर हे चुकीचं आहे, दोघांनाही आज या क्षणी बोलायचं नाही गरज नव्हती, आणखी फार लांब जायचं आहे, आज फार महत्त्वाचा दिवस आहे, आपण सगळे पुढे होऊन दादासाठी सगळं करत आहे, कोणीही विरोधात उभा राहिलेला नाहीये, आता मला वाटते की त्या गोष्टी बोलायची गरज नव्हती.

Shriniwas Pawar Baramati : राजकारण म्हणून फक्त पवार साहेबच निर्णय घ्यायचे

सर्व परिवाराचा संवाद आहे, पण राजकारण म्हणून फक्त पवार साहेबच निर्णय घ्यायचे, पहिल्यापासून अगदी साठ वर्षे झाली साहेब ठरवतात, कारण ते त्यांचं क्षेत्र आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक होतो. आता जरा काल साहेबांना ऍडमिट केलं, त्यांची तब्येत बरी नव्हती, एखाद दिवस ते या दोघांना बोलतील, साहेबांना न विचारता ते दोघांनी वक्तव्य केलं त्यामुळे ते बोलतील असंही पुढे श्रीनिवास पवारांनी म्हटलं आहे.

Shriniwas Pawar Baramati : दौरे वाढले आहेत, पण साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी …

रोहित पवारांना बारामतीतून निवडणूक लढवायची इच्छा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, आता ते त्यानेच ठरवायचं आहे, त्याच्या डोक्यात काय आहे ते आपण सांगू शकत नाही, ते सर्व काळच ठरवेल, अलीकडे रोहित पवारांचा बारामतीकडे दौरा वाढलेला दिसत आहे, यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, हो ते मी पण बघत आहे, दौरे वाढले आहेत, पण साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी त्याला घ्यायचे असेल तर सांगता येत नाही, म्हणूनही कदाचित वाढले असतील, असेही पुढे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed.