VIDEO: शुभमन गिलची रणजी ट्रॉफीत 'वन रन इनिंग'! अजय मंडलच्या फिरकीने केला गेम ओव्हर
भारतीय कर्णधार शुभमन गिलचे रणजी ट्रॉफी पुनरागमन म्हणावे तसे झाले नाही. रविवारी (१८ ऑक्टोबर) न्यू चंदीगडच्या पीसीए स्टेडियमवर छत्तीसगडविरुद्ध पंजाबकडून खेळताना गिल केवळ एक धाव करून बाद झाला.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून कर्णधार उदय सहारण याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज अजय मंडल याने बाद केले. गिलने बाद होण्यापूर्वी पाच चेंडूत एक धाव काढली.
गिल सरळ रेषेत आलेल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तो चेंडू गिलच्या बॅट आणि पॅडच्यामधून थेट स्टम्पवर आदळला.
११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामातील पहिल्या सामन्याला गिल मुकला होता, मात्र आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी तो या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी झाला.
भारताला न्यूझीलंड दौऱ्यात ५-५ सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत. अशा या मोठ्या दौऱ्याच्या तयारीसाठी गिल रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी झाला, मात्र त्याचे पुनरागमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही.
त्याचबरोबर २०२७ विश्वचषकाच्या तयारीसाठी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशीप (WTC) अंतिम फेरीच्या पात्रता शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे. गिल भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबची स्थिती पाहिली, तर त्यांनी पहिल्या डावात ४८ षटकांत ३ विकेट्स गमावून १३९ धावा केल्या आहेत. छत्तीसगडकडून आतापर्यंत सर्वाधिक विकेट अजयने घेतल्या. त्याने १० षटकांत २७ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. (Shubman Gill departs for just 1 run by spinner Ajay Mandal, Punjab vs Chhattisgarh, Ranji Trophy Elite 2026-27)
Comments are closed.