सिद्धरामय्या पायउतार होण्याच्या तयारीत आहेत

आज देणार राजीनामा : मुख्यमंत्रिपदी शिवकुमारांची निवड जवळपास निश्चित : विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार घोषणा

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार पायउतार होण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांनी घेतला असून गुरुवारी सकाळी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. तर दुसरीकडे हायकमांडने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे बेंगळुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण कार्यक्रम शुक्रवारी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या याची तारीख निश्चित होणार आहे.

मंगळवार, 26 मे रोजी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या मॅरेथान बैठकीनंतर रात्रीच सिद्धरामय्या बेंगळूरला परतले. राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार सिद्धरामय्या हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तत्पूर्वी सकाळी 9 वाजता त्यांनी बेंगळुरातील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे सर्व मंत्र्यांना नाश्त्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतील. पत्रकार परिषदेनंतर ते लोकभवनमध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे नाश्त्यानिमित्त बोलावलेल्या बैठकीवेळी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे मुद्दे सर्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतील आणि त्यांना आपल्या राजीनाम्याबद्दलही माहिती देतील. मागील 3 वर्षांपासून राज्याच्या विकासासाठी काम केलेल्या सर्व मंत्र्यांचे आभार मानतील. सकाळची बैठक ही सिद्धरामय्या यांच्यासाठी निरोपाची बैठक असेल, असे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या भेटीसाठी लोकभवनकडे वेळ मागितली आहे. त्यामुळे ते गुरुवारीच राजीनामा देतील या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. ते लोकभवनकडून भेटीसाठी वेळ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

राजीनाम्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीत नवीन विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाईल. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची नवीन विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड होणार असल्याचे समजते. एआयसीसीचे मुख्य सचिव रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख निश्चित केली जाईल. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी होईल हे जवळपास निश्चित आहे.

के. सी. वेणुगोपाल आणि सुरजेवाला हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांना हायकमांडचा संदेश समजावून सांगतील. हायकमांडच्या निर्देशानुसार, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवकुमार आपल्या निवडीसाठी सर्व आमदारांची संमती मिळवण्याची प्रक्रिया पार पाडतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, नवीन विधिमंडळ पक्षाचे नेते राज्यपालांना भेटून शपथविधी सोहळ्dयाचे वेळापत्रक ठरवण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे सांगितले जात आहे.

निकटवर्तीय मंत्री आमदारांनी घेतली सिद्धरामय्यांची भेट

सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त समजताच बुधवारी सकाळपासूनच निकटवर्तीय मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘कावेरी’ येथे सिद्धरामय्या यांची भेट घेतली. मंत्री जमीर अहमद खान, एस. सी. महादेवप्पा, संतोष लाड, एच. के. पाटील, आर. बी. तिम्मापूर, के. जे. जॉर्ज, के. वेंकटेश यांनी यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे आमदार अशोक पट्टण, शिवलिंगेगौडा, मालून नंजेगौडा, बी. नागेंद्र, राजेंद्र राजण्णा, मागडी बाळकृष्ण, राघवेंद्र हिटनाळ, नासीर अहमद यांनी देखील सिद्धरामय्यांची भेट घेत चालू राजकीय घडामोडींविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी दिवसभर भेटीसाठी आलेल्या मंत्री-आमदारांना कोणताही प्रतिसाद न देता मौन बाळगले.

डॉ. परमेश्वर यांच्या निवासस्थान होमहवन

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी होमहवन केल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चेवेळी मुख्यमंत्रिपदासाठी डॉ. परमेश्वर यांचे नाव पुढे केले होते. याच दरम्यान परमेश्वर यांनी आपल्या निवासस्थानी होमहवन व विशेष पूजा केल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

…अन् शिवकुमार बेंगळूरला परतले

मुख्यमंत्री बदलासंदर्भात मंगळवारी दिवसभर काँग्रेस हायकमांडच्या बैठक झाल्यानंतर सिद्धरामय्या रात्रीच बेंगळूरला परतले. मात्र, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीतच ठाण मांडले. बुधवारी दुपारीच ते राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला यांच्यासोबत बेंगळूरला येणार होते. परंतु, वरिष्ठ नेत्यांना भेटीगाठीनंतर सायंकाळी ते दिल्लीहून रवाना झाले. रात्री 9:00 वाजता ते बेंगळूरला परतले. तर दुसरीकडे सुरजेवाला हे सायंकाळीच बेंगळूरला आले.

तीन वर्षांच्या कामगिरीबाबत सिद्धरामय्यांची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीबाबत भावनिक पोस्ट ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यामुळे ते पदत्याग करण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्यांनी, राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने सरकारला सत्तेची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही सरकारच्या सर्व कामगिरीचे श्रेय जनतेला समर्पित करत आहोत. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. पाच गॅरंटी योजना यशस्वीपणे घरोघरी पोहोचविल्या आहेत. कोणीही उपाशी झोपू नये यासाठी राबविलेल्या अन्नभाग्य योजनेंतर्गत कोट्यावधी कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा केला आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

शपथविधी कार्यक्रमाची तयारी?

राज्य राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्याच वेळी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी बुधवारपासूनच सुरू झाली. हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शपथविधी कार्यक्रम संपन्न होईल. या सोहळ्याच्या निमित्ताने बेंगळुरातील कंठीरवा स्टेडियम किंवा विधानसौधसमोर मंच उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्टेडियम आणि विधानसौधला भेट देऊन सुरक्षा, गर्दी नियंत्रण व कार्यक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी केली आहे.

आज नाही, उद्या बोलेन : सिद्धरामय्या

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी विधानसौधसमोरील जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. पत्रकारांनी सिद्धरामय्यांना दिल्लीतील घडामोडींविषयी विचारले असता त्यांनी ‘आज नाही, उद्या बोलेन’, असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

काँग्रेस हायकमांडने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नेतृत्व बदलासाठी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली नाही. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. डी. के. शिवकुमार यांनीही देखील अनेक मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री म्हणून काम केले आहे. ते संघटनाकुशल देखील आहेत.

– रणदीप सुरजेवाला, राज्य काँग्रेस प्रभारी

2028 च्या निवडणुकीचे सारथ्य सतीश जारकीहोळींकडे?

राज्यात मुख्यमंत्री बदलण्याबरोबरच कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षही बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविले गेले तर त्यांच्याजवळ असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले जाण्याची शक्यता आहे. 2023 ची विधानसभा निवडणूक डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्यानंतर शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे. आता मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागेल. त्यामुळे 2028 ची निवडणूक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री जारकीहोळी यांनी यापूर्वी हायकमांडसमोर मंत्रिपदाचा त्याग करून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ नेत्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष निवड देखील होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कोण हे हायकमांड ठरवेल : आर. व्ही. देशपांडे

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. ते गुरुवारी राजीनामा देऊ शकतात, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी दिली आहे. सिद्धरामय्यांनीच मुख्यमंत्रिपदावर कायम राहावे अशी आमदारांची इच्छा आहे. पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे हायकमांड ठरवेल. मी माझे मत हायकमांडला कळवले आहे, असे ते म्हणाले.

मी सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक : अशोक पट्टण

काँग्रेसचे आमदार अशोक पट्टण म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बुधवारी  दुपारी 3 नंतर ते राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांची भेटसाठी वेळ मागितला आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हा निर्णय हायकमांड घेईल. सुरजेवाला हे कर्नाटकात दाखल झाले आहेत. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकतात. मी सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. नवीन मंत्रिमंडळात मला स्थान मिळेल असा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

सर्व काही हायकमांड ठरवते : प्रियांक खर्गे

हायकमांडने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आधीच संपर्क साधला आहे. याबाबत दुसरे कोणीही काही करू शकत नाही. सर्व काही हायकमांडच ठरवते. सुरजेवाला बेंगळूरला  आले आहेत. ते जे काही म्हणतील, तेच हायकमांडने म्हटले आहे. इतर काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. सर्वांनी सुरजेवाला यांच्या वक्तव्याचे पालन केले पाहिजे, असे मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले.

Comments are closed.