Singapore Open 2026 – सिंधू, लक्ष्य आणि सात्विक-चिरागची उपांत्यपूर्व फेरीत धडक; एच. एस. प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीसह ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या मिश्र दुहेरी जोडीने गुरुवारी (28 मे 2026) आपापल्या सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवत सिंगापूर ओपन 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मात्र, पुरुष एकेरीमध्ये हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयला यजमान देशाच्या लोह कीन यू कडून 18-21, 21-16, 15-21 अशा अटीतटीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

महिला एकेरीच्या सामन्यात अनुभवी पी. व्ही. सिंधूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जपानच्या रिको गुंजीचा सरळ गेममध्ये अवघ्या 37 मिनिटांत पराभव केला. सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले नियंत्रण राखले होते. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना अव्वल मानांकित आन से-यंगशी होईल. दुसरीकडे, पुरुष एकेरीमध्ये थायलंडच्या कुनलावुत वितीदसरनने सामना सुरू होऊन अवघे दोन गुण झाल्यानंतर दुखापतीमुळे माघार घेतल्याने लक्ष्य सेनला पुढील फेरीत सहज प्रवेश मिळाला. लक्ष्यचा पुढील सामना जपानच्या कोकी वातानाबे याच्याशी होणार आहे.

पुरुष दुहेरीत चौथ्या मानांकित सात्विक आणि चिराग जोडीने चिनी तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांचा 21-15, 11-21, 21-18 असा पराभव केला. दुसरा गेम गमावल्यानंतर हिंदुस्थानी जोडीने निर्णायक गेममध्ये दमदार पुनरागमन केले आणि या जोडीविरुद्ध आपला 7-0 असा रेकॉर्ड कायम राखला. आता त्यांचा सामना मलेशियाच्या कांग खाई झिंग आणि अ‍ॅरॉन ताई यांच्याशी होईल. तसेच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टोने पहिल्या गेममधील 8-21 अशा मोठ्या पराभवानंतर जबरदस्त पुनरागमन करत जपानच्या युता वातानाबे आणि माया तागुची यांचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्या चेन तांग जी आणि तोह ई वेई यांचे कठीण आव्हान असेल.

Comments are closed.