शीव-पनवेल महामार्गावर बेस्ट बसला भीषण अपघात, पादचारी वृद्धाचा चिरडून जागीच मृत्यू; चालक-वाहकासह दहाजण जखमी

बेस्ट बसच्या जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे. शीव-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी बेस्टच्या ताफ्यातील खासगी कंपनीच्या भरधाव बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या बसने मानखुर्द ब्रिजच्या कठडय़ाला धडक देत पादचारी वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर चालक-वाहकासह दहा जण जखमी झाले. बेस्टच्या ताफ्यातील खासगी कंपन्यांच्या वाढत्या अपघातांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बेस्टच्या ताफ्यातील ‘मातेश्वरी’ या खासगी कंपनीची प्रतीक्षानगर आगारातील बस कुर्ला बस स्थानक (पूर्व) ते ऐरोली मार्गावर धावत होती. शीव-पनवेल मार्गावर या बसचे ब्रेक निकामी झाले आणि नियंत्रण सुटलेल्या बसने वृद्ध पादचाऱयाला चिरडून मानखुर्द ब्रिजच्या कठडय़ाला जोरदार धडक दिली. यात 62 वर्षीय भास्कर रावसाहेब कागदे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बसचालक आणि वाहक यांच्यासह 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पोलिसांमार्फत शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर बसचालक व वाहकाला राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी

ऐन सकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. मानखुर्द मेट्रो स्थानकाखालील परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि बेस्टच्या आपत्कालीन यंत्रणेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त बस बाजूला केली. त्यानंतर अर्धा ते एक तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. कोंडीमुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल झाले.

अपघाताची सखोल चौकशी होणार, पालिकेच्या सभेत उमटले तीव्र पडसाद

मानखुर्द येथे आज ‘बेस्ट’ची बस डिव्हायडरवर आदळून पादचारी वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद आज महापालिकेच्या सभेत उमटले. भाडेतत्त्वावरील बस, त्यांच्या मेंटनन्सचा अभाव, ड्रायव्हर-कंडक्टरची कंत्राटी पद्धतीने भरती, प्रशिक्षणाचा अभाव, बेदरकारपणे गाडी चालवणे आदी मुद्दय़ांवर सदस्यांनी आवाज उठवला. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

यासंदर्भातील हरकतीचा मुद्दा नगरसेविका अपेक्षा खांडेकर यांनी मांडत चौकशीची मागणी केली. मोठय़ा बसऐवजी लवकरात लवकर मिनी बसेस आणाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका दीपमाला बढे यांनी केली. अपघातग्रस्त बस ही मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावर घेतलेली सीएनजी बस आहे. यापुढे मातेश्वरी कंपनीची एकही बस घ्यायची नाही, अशी सूचना मी देत आहे. त्याऐवजी स्वतःच्या हक्काच्या बस घ्याव्या लागतील, असे बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.

नुकसानभरपाईचे धोरण ठरवा – किशोरी पेडणेकर

30 नोव्हेंबर 2025 मध्ये बेस्ट बसच्या अपघातात 52 वर्षीय महिलेच्या पायावरून बस गेली. त्या महिलेचे दोन ऑपरेशन झाले. तिसरे ऑपरेशन होणार आहे, मात्र तिला उपचाराचा एक पैसाही दिलेला नाही. या घटनेचा चौकशी अहवाल सर्वांसमोर आला पाहिजे. तसेच भरपाईचे धोरण करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

बेस्टच्या गॅरेजमध्ये बसचा मेंटनन्स करा – सचिन पडवळ

ठेकेदारी पद्धतीने चालविण्यात येणाऱया बस गाडय़ांचा मेंटनन्स बेस्ट प्रशासनाच्या गॅरेजमध्ये करून त्याचा खर्च ठेकेदाराकडून घ्यावा, अशी सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडली. ठेकेदारी पद्धतीने चालविण्यात येणाऱया गाडय़ांमधील ड्रायव्हर व कंडक्टर यांना कायमस्वरूपी बेस्ट उपक्रमात सामील करून घेऊन त्यांना नव्याने रुजू झालेल्या ड्रायव्हरप्रमाणे त्यांना 36 हजार रुपये पगार द्यावा, अशी मागणी सचिन पडवळ यांनी केली.

Comments are closed.