स्मृती मानधना-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलला; प्रकृती बिघडल्याने स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल


स्मृती मानधना पलाश मुच्छाल लग्नाच्या बातम्या : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत पार पडणार होता. मात्र आनंदाच्या या क्षणी अचानक विघ्न आलं आहे. स्मृती मानधनाचे वडील श्री. श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं.

लग्नसोहळा पुढे ढकलला, कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

आता स्मृती मानधना हिचा आजचा विवाह सोहळा अखेर पुढे ढकलण्यात आला आहे. मानधना यांच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. सकाळी अचानकपणे स्मृती मानधना यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत.

कुटुंबाने सांगितले की, “जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” पलाश मुच्छल आणि मानधना कुटुंबीयांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने हा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की, स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अफवा न पसरवता त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.

मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार होता विवाह

भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये आल्या होत्या. आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता होणार होता. या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील अशी माहिती पोलिसांच्या कडून देण्यात आली होती. मात्र आता स्मृती मानधना हिचा आजचा विवाह सोहळा अखेर पुढे ढकलण्यात आला आहे.

2019 पासून प्रेम, आता विवाहबद्ध

स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. यांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा… या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होते.

हे ही वाचा –

Smriti Mandhana Father News : लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली, सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.