शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; हादरवणारी घटना

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 4 वर्षांपूर्वी मोठा शेअर मार्केट (Share market) घोटाळा उघडकीस आला होता. विशाल फटे नावाच्या तरुणाने शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना कोट्यवधि रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी, अद्यापही आरोपी फटे तुरुंगात असून त्याच्या जाळ्यात अडकलेले आर्थिक नुकसानीतून पुढे आले नाहीत. मात्र, तरीही बार्शीत (Barshi) शेअर मार्केटमधून जास्त पैसा कमावण्याच्या नादात स्वत:ला कर्जबाजारी करत आहे. तर, याच कर्जातून मुक्त होण्यासाठी एका तरुणाने चक्क 73 वर्षीय वृद्ध महिलेला स्वत:च्या घरी बोलवून धारधार शस्त्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगुबाई गडदे यांचा शोध लागला, पण अंगावर शहारे आणणारा थरारक शेवट झाल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

शशिकांत किसन वायकुळे (वय 64, रा. उपळाई रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी चांगदेव पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 238 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांची चुलत बहीण गंगुबाई कालीदास गडदे (वय 73, रा. हांडे गल्ली, कचेरी रोड, बार्शी) या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरातील भाडेकरुंमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, 25 मार्च 2026 रोजी गंगुबाई आपल्या घराला कुलूप लावून कोणालाही न सांगता निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी 27 मार्च रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार (क्र. 42/2026) दाखल केली होती. तपासादरम्यान, स्थानिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये गंगुबाई या संशयित चांगदेव गोवर्धन पाटील (रा. हत्तीज, ता. बार्शी; सध्या पवार बिल्डिंग, शिवाजीनगर) यांच्यासह इमारतीत जाताना दिसून आल्या. मात्र, त्या परत बाहेर येताना दिसल्या नाहीत. विशेष म्हणजे परिसरातील संबंधित सीसीटीव्ही फुटेजही डिलिट झाल्याचे आढळून आले.

लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या

बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रगटीकरण पथकातील पोलीस हवालदार अमोल माने, प्रवीण साठे, सचिन देशमुख, राहुल उदार, अंकुश जाधव, बाळकृष्ण मुठाळ, अविनाश पवार, उघडे हे बेपत्ता महिलेचा शोध घेत होते. पोलिसांनी संशयिताचा शोध घेत असताना अखेर त्याला 2 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. संशयित चांगदेव पाटील याने शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीमुळे पैशांची गरज असल्याने गंगुबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यासाठी वृद्ध आजीच्या हत्येचा बनाव रचला. त्यानुसार, 25 मार्च रोजी त्याने गंगुबाई यांना आपल्या घरी बोलावून लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर टॉवेलने नाक दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह एका काळपट रंगाच्या पिशवीत भरून आपल्या कार (हुंदाई वेरना, क्रमांक MH-20 CS 8937) मधून नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विल्हेवाट लावल्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे आरोपी आणि गंगुबाई यांचे नाते कुटुंबवत्सल होते, आरोपी हा गेल्या 5 वर्षांपासून त्यांच्याच इथे भाड्याने राहत होती अशी माहिती आहे.

हेही वाचा

धक्कादायक! पोलीस स्टेशन शेजारीच असणारं ATM मशीन चोरीला, 10 लाखांची रोकड लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

आणखी वाचा

Comments are closed.