कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उ


सोलापूर भाजप बातम्या: सोलापूर (Solapur) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) सध्या अंतर्गत कलह निर्माण झाला असून, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा परिणाम म्हणून आज (21 ऑक्टोबर) भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण चार माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही दिवाळीनंतर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली आहे.

Solapur BJP News: भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच, दक्षिण सोलापूरमधील भाजप कार्यकर्त्यांत तीव्र संताप उसळला आहे. यावर विरोध नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज पक्ष कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन भाजपच्या अंतर्गत नाराजीचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा मोठा संकेत मानला जात आहे.

Solapur BJP News: दिलीप माने यांच्या प्रवेशास तीव्र विरोध

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशास तीव्र विरोध करत असून, घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत. भाजपचेच कार्यकर्ते अप्पासाहेब मोटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माने यांच्या प्रवेशाचा निषेध करत धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.

Solapur BJP News: भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार

या पार्श्वभूमीवर भाजपचे काही वरिष्ठ नेतेही नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी एका ज्येष्ठ नेत्याशी बोलताना, “तुमच्या पक्षात जी अवस्था आहे, तशीच आमच्या पक्षात आमची अवस्था झाली आहे,” अशी खंत व्यक्त केल्याचे समजते. सुभाष देशमुख यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख हेही सध्या या घडामोडींपासून दूरच आहेत. आजच्या धरणे आंदोलनात माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.

Solapur BJP News: राजकीय खेळी बूमरँग ठरणार?

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांतर्गत फोडाफोडीची मोठी राजकीय खेळी रचण्यात आली होती. मात्र, हीच खेळी आता भाजपसाठी बूमरँग ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना सामावून घेताना जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी ही पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. आजचे धरणे आंदोलन आणि त्यानंतरचा पक्षांतर्गत उद्रेक भाजपच्या भविष्यासाठी कोणत्या दिशा ठरवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Municipal-Nagarpalika Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये धुसफूस; ठाणे, नवी मुंबईपासून सातारा, सांगली, रायगडपर्यंत…कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.