नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर हादरलं!
सोलापूर क्राईम न्यूज : मोबाईल फोनच्या व्यसनामुळे किंवा हट्टापायी तरुण पिढी किती टोकाचे पाऊल उचलत आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रकार सोलापूरच्या (Solapur) मोहोळ (Mohol) शहरात समोर आला आहे. नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रवीण जगदीश मायाचारी (वय 21) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील प्रवीण मायाचारी हा ‘बीबीए’ (BBA) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. साधारण सात दिवसांपूर्वी प्रवीणचा जुना मोबाईल फोन फुटला होता. तेव्हापासून त्याने घरी नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला होता.
Solapur Crime News: नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट
प्रवीणचे वडील जगदीश मायाचारी यांचे मोहोळ शहरात छोटेसे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. याच दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रवीणने मोबाईलचा हट्ट धरला तेव्हा आई-वडिलांनी त्याला समजावले होते. आई-वडिलांनी पैसे आल्यानंतर मोबाईल घेऊन देतो, असे त्यास सांगितले होते.
Solapur Crime News: दरवाजा तोडला अन् कुटुंबियांना धक्काच बसला
3 एप्रिल रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण उरकून प्रवीण रात्री 10 वाजता आपल्या खोलीत झोपायला गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपर्यंत तो खोलीबाहेर आला नाही, म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांचा संशय बळावला. अखेर वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. प्रवीणने खोलीत गळफास घेतल्याचे दिसून आले.
Solapur Crime News: पोलिसांत आई-वडिलांचा जबाब
या घटनेनंतर मायाचारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मोहोळ शहर पोलीस ठाण्यात पालकांनी आपला जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. एका साध्या मोबाईल फोनसाठी उच्चशिक्षित तरुणाने आपले आयुष्य संपवल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.