डॉक्टरसह गर्जेचा जामीन न्यायालयाने फेटाळला, बोगस अपंगत्व प्रमाणपत्र रॅकेटला धक्का
सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमधून अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी डॉ. सतीश भाऊराक कनाके आणि विजय बाबासाहेब गर्जे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उल्का जोशी यांनी फेटाळून लावला. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार ठाण्यात राजेश जाधव, महेश बारगजे, राजेश ढवण, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसिम खान, सागर रजपूत आणि डॉ. सतीश कनाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता यूडीआयडी पोर्टलच्या माध्यमातून बोगस अपंगत्व प्रमाणपत्र तयार करून दिल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रासाठी लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपी राजेश जाधव याच्यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत विविध आरोपींमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी नाशिक येथील सायबर कॅफेमधून कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित संगणक पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील व्हॉट्सऍप चॅटिंग आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. काही बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांचीही तपासणी सुरू आहे. या प्रकरणात सिव्हील हॉस्पिटलमधील दोन वरिष्ठ लिपिकांसह अन्य व्यक्तींचा सहभाग उघड झाला असून, आणखी किती बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. त्यासाठी किती रक्कम घेण्यात आली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी आरोपींच्या जामीनाला विरोध केला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, तपास अद्याप सुरू आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट करण्याची किंवा तपासावर परिणाम करण्याची शक्यता असल्याचा युक्तिकाद त्यांनी केला. आरोपींतर्फे ऍड. पी. बी. भिसे आणि ऍड. शहानवाज शेख यांनी काम पाहिले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद, तपासाची सद्यस्थिती, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने डॉ. सतीश कनाके आणि विजय गर्जे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
Comments are closed.