सोलापूर न्यूज – माढा तालुक्यातील आगडोम! चार दुकाने जळून खाक, करोडोंचे नुकसान
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील करमाळा चौकातील विश्वकर्मा या फर्नीचर दुकानास लागलेल्या भीषण आगीने इतर चार दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हाणी झाली नसली तरी एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग मंगळवार, दि. 19 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लागली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील करमाळा रोड लगत असलेल्या पुष्पक मंगल कार्यालया जवळ असलेल्या गाळ्यांमध्ये असणाऱ्या फर्निचर दुकानाला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रथम आग लागली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शेजारील हार्डवेअर दुकानाबाहेर ठेवलेल्या प्लास्टिक साहित्याने पेट घेतला. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या आगीत राऊत व आकाश सुतार यांची दोन फर्निचर दुकाने, महेश तोडकर यांचे हार्डवेअर दुकान तसेच वैभव तोडकर यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकान जळून खाक झाले आहे. दुकानांमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, हार्डवेअर माल आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे तसेच करमाळा कुर्डूवाडी इंदापूर नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत चारही दुकाने पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीच्या ज्वाळा शेजारील बारामती अर्बन बँकेपर्यंत पोहोचल्या होत्या. बँकेच्या खिडकीतून ज्वाला आत गेल्याने काही कागदपत्रांनी पेट घेतला होता. मात्र, स्थानिक युवक व बँक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने साहित्य बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळले. सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे रोडवर व चौकात वहातुक ठप्प झाली होती. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Comments are closed.