जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही घराणेशाही, सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणाचे नातेवाईक?
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक नुकतीच राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. यानंतर लगेच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लाकची शेवटची तारीख होती. या निवडणुकांसाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपली पुढची पिढी राजकारणात आणली आहे. या निवडणुकांमध्ये देखील घराणेशाही दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात कुठे कुठे राजकीय नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे, याबाबतची माहिता पाहुयात.
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांसह सातपुतेंच्या घरात उमेदवारी
माळशिरस तालुक्यात शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि वहिनी वैष्णवी देवी मोहिते पाटील या शरद पवार गटाकडून निवडणुकाच्या रिंगणात आहेत. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर व कन्या ज्योती जानकर निवडणूक रिंगणात आहेत. तसेच माळशिरस मधूनच भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या भाजपकडून दहिगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांचे पुत्र रिंगणात
सांगोला तालुक्याचे माजी विधान परिषद आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पाटील हे जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.
मंगळवेढ्यातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या निवडणुकीच्या रिंगणात
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल या शरद पवार गटाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवीत आहेत.
करमाळ्यात रश्मी बागल कोलते निवडणुकीच्या रिंगणात
दिवंगत माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल कोलते या भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
पंढरपूरमधून कल्याणराव काळे यांच्या घरात उमेदवारी
पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांच्या वहिनी मोनिका समाधान काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वाखरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली आहे. माजी दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुतणे व्यंकटराव भालके हे गोपाळपूर गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे उमेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात
कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः उमेदवार आहेत. तर नरखेड जिल्हा परिषद गटातून त्यांचे बंधू संतोष पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.