काँग्रेसमधील काही जण 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये सहभागी
मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांचा गौप्यस्फोट : वडिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी कट
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचल्याचे आरोप झाल्याने राज्य काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी या प्रकरणासंदर्भात गौप्यस्फोट केला असून आपल्या वडिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यात काँग्रेसमधीलच काही व्यक्तींचा सहभाग होता, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य राजकारणात स्टिंग ऑपरेशनमुळे मोठा वाद निर्माण झालेला असतानाच मंत्री यतींद्र यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
शुक्रवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना यतींद्र यांनी, सिद्धरामय्या यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान रचण्यात आले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये काँग्रेस पक्षाचेच काही जण सामील असल्याचे वरकरणी दिसत आहे. तसेच, या फुटेजमध्ये एका प्रसारमाध्यमाचा प्रमुख देखील स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या कृत्यासाठी संपूर्ण पक्षाला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, त्यांनी सांगितले. चौकशीतून सत्य समोर येईल आणि शेवटी सत्याचाच विजय होईल. इतरांनी कितीही आरोप केले तरी, सत्य समोर येईपर्यंत सिद्धरामय्या हे या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्टिंग ऑपरेशनसंबंधी केलेल्या आरोपांनंतर, काँग्रेसच्या महिला नेत्या कृपा अल्वा यांना नोटीस बजावण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काँग्रेस नेत्या कृपा अल्वाच आहे, असा आरोप एच. डी. कुमारस्वामी यांनीही केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला पुत्तूर मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक होती.
पुराव्यासह सत्य नक्कीच समोर येईल : हरिप्रसाद
स्टिंग ऑपरेशनबाबत यतींद्र सिद्धरामय्या यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी, राजकीय सूड उगवण्यासाठी काही व्यक्तींनी केलेले हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. अशा गोष्टी घडू नयेत, असे माझे मत आहे. जर या स्टिंग ऑपरेशनमध्ये काँग्रेस पक्षातील कोणी सहभागी असेल, तर व्हिडिओ पुराव्यासह सत्य नक्कीच समोर येईल. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
व्हिडिओमध्ये कोण दिसत आहे, त्यामागील सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यासाठी सीआयडी आणि सीबीआय सारख्या तपास संस्था अस्तित्वात आहेत. जर या प्रकरणाची सखोल चौकशी केली, तर ती खूप आधीपासून करावी लागेल, अशी टिप्पणी त्यांनी भाजपला उद्देशून केली.
ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने कारस्थान : सिद्धरामय्या
स्टिंग ऑपरेशन प्रकरणासंबंधी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. ही बाब माझ्या निदर्शनास या वर्षी सप्टेंबर महिन्यात आली. एका पत्रकाराने आणि मंगळूरच्या कृपा अल्वा यांनी संगनमत करून हे कृत्य केले आहे. मला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने रचलेले हे एक पद्धतशीर कारस्थान आहे. खोटे आरोप आणि द्वेषपूर्ण प्रचार पसरवण्यापासून रोखण्यासाठी मी न्यायालयाकडून आदेश मिळवला आहे. सत्य जनतेसमोर आणण्यासाठी मी स्वत: पोलिसांत तक्रार दिली होती. माझ्यावरील सर्व आरोप असत्य आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली.
Comments are closed.