सोनम वांगचुक आपले उपोषण संपवणार आहेत
कोणत्याही आंदोलकावर कारवाई न करण्याची अट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि नीट-युजी प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी गेले 26 दिवस उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपविण्याचा विचार चालविला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारसमोर एक अट ठेवली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री जगतप्रकाश न•ा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. तिघांचीही काही काळ चर्चा झाली. त्यानंतर, वांगचुक यांनी या दोन मंत्र्यांच्या नावे एक पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी उपोषण मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, नीटप्रश्नी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, अशी अट त्यांनी केंद्र सरकारला कळविली आहे. केंद्र सरकार ही अट मान्य करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दीपके यांचीही विनंती
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती अभिजित दीपके यांनीही केली आहे. आता आंदोलन आम्ही पुढे चालवू. तुमची देशाला आवश्यकता आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा जीव पणाला लावू नका, असा संदेश त्यांनी वांगचुक यांना पाठविल्याचे वृत्त आहे. परिणामी, वांगचुक यांचे उपोषण लवकरच समाप्त होईल, अशी शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये हा निर्णय होणार आहे.
खासदारांची विनंती
सोनम वांगचुक यांच्याशी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी संपर्क साधला आहे. त्यांच्यापैकी काही खासदार त्यांना प्रत्यक्ष भेटून गेले आहेत. तर काही खासदारांनी त्यांना पत्र पाठविले आहे. सर्व खासदारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तथापि, ज्या आंदोलक विद्यार्थ्यांशी मी जोडला गेलो आहे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित केल्याखेरीज मी उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मला जिवंत रहायचे आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये परत जायचे आहे. माझे जीवन ज्या कार्यामुळे घडले, त्या कार्याचा पुन्हा नव्या जोमाने प्रारंभ करायचा आहे. तथापि, या तरुण आंदोलकांना वाऱ्यावर सोडून मी कोणतेही पाऊल उचलणार नाही. त्यामुळे या आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यांच्यावर सूड उगविण्याचा प्रयत्न होणार नाही, असे स्पष्ट आणि नि:संदिग्ध आश्वासन मिळाल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
जंतरमंतरवरील आंदोलन
नीट परीक्षेसंबंधात हाती घेण्यात आलेले आंदोलन अद्यापही होत आहे. या आंदोलनाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी आणि दीपके यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला असून दिवसेंदिवस अधिकाधिक लोक या आंदोलनात भाग घेण्यासाठी येथे येत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. आमच्याशी चर्चा करायची असेल, तर आता केंद्र सरकारच्या प्रतिनिधींना जंतरमंतरवर यावे लागेल. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण होत राहील, असा इशाराही दीपके यांनी दिला आहे.
प्रकृती स्थिर आहे
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सोनम वांगचुक यांना त्यांच्या इच्छेनुसार रुग्णालयात न्यावे, असा आदेश दिल्यानंतर मंगळवारी रात्रीच त्यांना गुरुग्राम येथील ‘मेदांता’ रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. सफदरजंग रुग्णालयाने त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल नव्या रुग्णालयाला हस्तांतरीत केले आहेत. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असली, तरी ती स्थिर आहे, असे मेदांताच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. उपोषण संपेपर्यंत ते तेथेच राहणे शक्य आहे.
…तर त्वरित उपोषण सोडणार
केंद्र सरकारकडून असे सुस्पष्ट शब्दांमध्ये आश्वासन मिळाताक्षणीच मी उपोषण सोडणार आहे. उपोषण सोडण्यासाठी त्यानंतर कोणताही विलंब लागणार नाही. केंद्र सरकारने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, हे शुभचिन्ह आहे. मात्र, मला त्यांच्या सुरक्षेविषयी नि:संदिग्ध आश्वासन न मिळाल्यास मी माझे उपोषण मागे घेणार नाही, ही बाब निश्चित आहे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे.
तणाव निवळण्याच्या मार्गावर…
ड सोनम वांगचुक यांची अट केंद्र सरकारकडून मान्य होण्याची दाट शक्यता
ड मागण्या मान्य होईपर्यंत जंतरमंतरवरच राहणार, आंदोलकांनी घेतला निर्णय
ड जंतरमंतरभोवती बॅरिकेडस्चे संरक्षण, दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Comments are closed.