अण्णाद्रमुकमध्ये फूट; बंडखोर गट TVK ला समर्थन देतो

जनादेश विजय यांच्यासोबत, द्रमुकसोबत जाणे चुकीचे : षणमुगम

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत अण्णाद्रमुक पक्ष दोन हिस्स्यांमध्ये विभागला गेला आहे. पक्षाचे नेते सी.व्ही षणमुगम यांनी मुख्यमंत्री विजय यांचा पक्ष टीव्हीकेला समर्थन देण्याची अधिकृत घोषणा केली आहे षणमुगम यांच्यासोबत 30 आमदारांनी विजय यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आम्ही जनतेचा आदेश स्वीकारत आहोत. हा जनादेश टीव्हीकेसाठी नाही,त र विजय यांच्यासाठी आहे. याचमुळे आम्ही टीव्हीके सरकारला स्वत:चे समर्थन देत आहोत. जर द्रमुकसोबत आम्ही आघाडी केली असती तर अण्णाद्रमुकचे अस्तित्वच समाप्त झाले असते असा दावा षणमुगम यांनी मंगळवारी केला आहे.

अण्णाद्रमुक पक्ष फोडण्याची मागणी इच्छा नाही. एडप्पादी पलानिस्वामी हेच आमचे नेते आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे. विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला केवळ 47 जागांवर विजय मिळविता आला आहे. पक्षात आता केवळ पलानिस्वामी गट राहिला असून यात 17 आमदार सामील आहेत.

पक्ष मजबूत करण्यावर भर

अण्णाद्रमुकची स्थापना आम्ही द्रमुकच्या विरोधात केली होती. 53 वर्षांपासून आमचे राजकारण द्रमुकच्या विरोधात राहिले आहे. तर द्रमुकच्या समर्थनाने अण्णाद्रमुकचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु आमच्या बहुतांश सदस्यांनी तो नाकारला. जर आम्ही द्रमुकसोबत आघाडी केली असती तर अण्णाद्रमुकचे अस्तित्व संपुष्टात आले असते. आम्ही अद्याप कुठल्याही आघाडीशिवाय उभे आहोत आणि आता आमचे लक्ष स्वत:चा पक्ष पुन्हा मजबूत करण्यावर असल्याचे षणमुगम यांनी म्हटले आहे.

अण्णाद्रमुकमध्ये फूट का पडली?

पक्षांच्या नेत्यांमध्ये अविश्वास : अधिकृतपणे एडप्पादी पलानिस्वामी हे अण्णाद्रमुकचे महासचिव आहेत, परंतु पक्षातील बहुतांश नेते आता त्यांच्यासोबत नाहीत. बंडखोर गट आता औपचारिक स्वरुपात वेगळा होण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.

मागील 5 निवडणुकांपासून पक्ष हरतोय : पक्षातील हे संकट अण्णाद्रमुकसाठी एका अवघड काळात समोर आले आहे, 2019 ची लोकसभा निवडणूक, 2021 ची विधानसभा निवडणूक, 2024 ची लोकसभा निवडणूक, 2025 मधील इरोड पोटनिवडणूक आणि वर्तमान निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे.

पलानिस्वामींचे भाजपसोबत मतभेदत : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीसंबंधी चर्चेदरम्यान एडप्पादी पलानिस्वमी यांनी कथित स्वरुपात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला होता, तेव्हापासून केंद्र सरकारसोबतचे त्यांचे संबंध खराब झाले असे अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांचे सांगणे आहे.

भाजपला प्रतिकूल मतदारसंघ : पलानिस्वामी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकरता 27 जागा सोडल्या होत्या. या मतदारसंघांमध्ये विजय मिळविणे अत्यंत अवघड होते. पलानिस्वामी यांनी एकप्रकारे राजकीयदृष्ट्या भाजपला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असा आरोप बंडखोर नेत्यांनी केला आहे.

Comments are closed.