उदयनिधींचे 'सनातन'बाबत पुन्हा वादग्रस्त विधान

सनातन संपविण्यात यावे अशी विधानसभेत टिप्पणी

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि द्रमुक आमदार उदयनिधी स्टॅलि यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सनातन धर्माने लोकांना विभागण्याचे काम केले असल्याने तो संपविला जावा असे उदयनिधी यांनी विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीतच म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात संतापाचे चित्र दिसून येत आहे.

उदयनिधी यांनी स्वत:च्या संबोधनात राजकीय शिष्टाचार आणि सहकार्याचाही मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांना आमच्या नेत्यासमवेत अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि हाच सौहार्द विधानसभेतही दिसून यावा. सत्तारुढ आणि विरोधक वेगवेगळ्या ठिकाणी बसत असले तरीही तामिळनाडूच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करावे असे उदयनिधी यांनी नमूद केले आहे.

वंदे मातरमचा उल्लेख

विधानसभेत उदयनिधी यांनी तामिळनाडू राज्य गीतावरूनही नाराजी व्यक्त केली. वंदे मातरम्नंतर राज्य गीत लावण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात वंदे मातरम् लावले गेले नव्हते आणि तेथे राज्यपाल कोण आहेत हे सर्वजण जाणून आहेत. भविष्यात तामिळनाडूच्या राज्य गीताला कधीच दुसऱ्या स्थानावर ठेवले जाऊ नये अशी मागणी उदयनिधी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री विजय आणि मी एकाच महाविद्यालयात शिकलो आहोत. अशास्थितीत मी माझा अनुभव आणि ज्ञान पुरवू इच्छितो तसेच मुख्यमंत्री विरोधी पक्षांच्या सूचना स्वीकारतील अशी अपेक्षा करत असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे.

भाजपकडून लक्ष्य

सनातन संबंधी उदयनिधींच्या टिप्पणीवर भाजपने जोरदार टीका केली आहे. उदयनिधींचे वक्तव्य विषारी आहे. उदयनिधी हे तामिळनाडूचे राहुल गांधी असून ते विभाजनकारी द्वेषाचे राजकारण फैलावू पाहत आहेत. राहुल गांधींनी पवित्र सेंगोलची चेष्टा केली आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अपमानकरत त्यावर बहिष्कार टाकला होता. राहुल गांधींना मागील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने नाकारले आहे. तर उदयनिधी देखील तामिळनाडू जनतेने पराभूत केल्यावरही विषारी वक्तव्यं करत आहेत. विभाजनकारी द्रमुकने कार्तिकेय दीपमला विरोध केला होता तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे टाळले होते. तामिळनाडूच्या राज्यचिन्हात एका मंदिराचा गोपुरम आहे आणि तामिळनाडूचे लोक स्वत:ची श्रद्धा आणि भावनांचा असा घोर अपमान कधीच विसरणार नाहीत तसेच माफही करणार नसल्याचा दावा भाजप नेते केशवन यांनी केला आहे.

Comments are closed.