राज्य कर्मचारी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसऱ्या दिवशी कर्मचारी मागण्यांवर ठाम
महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित बेमुदत संपाला बुधवारी दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीच्या परिसरात संपकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला कर्मचारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते सुधाकर सावंत, मध्यवर्ती संघटनेचे कोकण विभाग संघटक रुपेंद्र शिवलकर, समन्वय समितीचे अध्यक्ष शांताराम कांबळे, अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा समन्वय समितीचे सचिव सागर पाटील, समन्वय समितीचे निमंत्रक चंद्रकांत चौघुले, सर्व घटक संघटनांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना कामगार नेते सुधाकर सावंत यांनी 14 डिसेंबर 1977 च्या 54 दिवसाच्या संपाचा उल्लेख करत राज्यकर्त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची ताकद कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे स्पष्ट केले. आपल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपाला पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले. कोकण विभागीय संघटक रुपेंद्र शिवलकर यांनी संपातील मागण्यांबाबत सविस्तर विवेचन केले. कामगार नेते र.ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती संघटनेने कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळवून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासंदर्भात शासनाचे अन्यायकारक धोरण स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्र हे अनुत्पादक क्षेत्र समजून अनेक अन्यायकारक निर्णय या क्षेत्रावर लादले जात आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. संचमान्यतेच्या अन्यायकारक निर्णयामुळे जिल्हयातील गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार असून मुलींचे शिक्षण पूर्णतः थांबण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समन्वय समितीचे अध्यक्ष शांताराम कांबळे यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संपामध्ये उतरण्याचे आवाहन केले. जिल्हा समन्वय समितीकडून अधिकृत कल्पना दिली जात नाही तोपर्यंत संप सुरू राहील असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी घटक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगतातून सरकारचा निषेध व्यक्त केला. सरकार कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे याची जाणीव सरकारने ठेवणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. उपस्थितांचे आभार निमंत्रक चंद्रकांत चौघुले यांनी मानले.
Comments are closed.