बीड कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत! कैद्याला मारहाण, ऑडिओ क्लिप व्हायरल
बीड जेल बातम्या : बीडच्या जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड गँगची (Walmik Karad Gang) दहशत पुन्हा वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अझर अब्दुल रहमान पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव आहे.
या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या कैद्याने एका व्यक्तीशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
Beed Jail Fight : बसण्याच्या जागेवरून वाद, मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, जेलमधील बॅरिकेटमध्ये बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला. या वादातून सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप यांनी अझर पठाण याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कैद्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याची माहिती समोर आली आहे.
Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपमुळे नवा ट्विस्ट
या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपमध्ये मारहाण झालेल्या कैद्याने गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकत नाही. त्यांनी पैसे घेतले आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत,” असा दावा त्या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.
सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या तिघांनी मारहाण केली. माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाही, त्यांनी पैसे खाल्ले आहेत. जेलर यांना याबाबत माहिती दिली, पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावर दमदाटी करून जेल बदली करण्याची धमकी दिली.
याची तक्रार कुठेही करा, माझं काहीही वाकड होत नाही अशी धमकी जेलरने दिली. जेलमध्ये मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. मला दवाखान्यात देखील घेवून जाण्यात आले नाही. वाल्मिक अण्णाकडे मला बोलावलं जात आहे, असं त्या कैद्याने सांगितल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे.
Jail Administration Response : प्रशासनाचा नकार
दरम्यान, या प्रकरणात कारागृह प्रशासनाने वेगळी भूमिका घेतली आहे. कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले की, मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याने कोणतीही तक्रार नसल्याचं लेखी दिलं आहे.
व्हायरल होत असलेल्या या ऑडिओक्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे.
Political Allegation : प्रकरण दाबण्याचा आरोप
या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी प्रशासनावर प्रकरण दाबण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाल्मीक कराड प्रकरण : कराड टोळीची तुरुंगात दहशत
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. मात्र कारागृहात असतानाही त्यांची दहशत कायम असल्याची चर्चा रंगत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कारागृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.