SLA vs INDA: दुसऱ्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, साई सुदर्शन-गुरनूर ब्रारची लक्षवेधी कामगिरी

भारत अ (इंडिया ए) संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यामधील कसोटी मालिकेत भारताने ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली खेळताना दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा १० विकेट्स राखत पराभव केला आहे. याबरोबर दोन सामन्यांची ही मालिका १-० अशी जिंकली. भारताच्या या धमाकेदार विजयाचे शिल्पकार साई सुदर्शन आणि गुरनूर ब्रार ठरले.

गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली आणि यजमान संघाला ३६६ धावसंख्येवर रोखले. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावत ५४३ धावा केल्या होत्या. त्यामध्ये सुदर्शनने १६८ धावांची खेळी केली आणि भारताने १७७ धावांची आघाडी घेतली.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भारताने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव २०९ धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ३३ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावात सुदर्शन २५ धावा आणि अमन मोखाडे ११ धावा करत नाबाद राहिले.

या सामन्यात सुदर्शनसोबत भारताच्या बाकी फलंदाजांनीही विशेष कामगिरी केली. देवदत्त पड्डीकलने ९४ धावा, जुरेलने ५३ धावा आणि सारांश जैन ७० धावा करत नाबाद राहिला. तसेच शेख रशीदनेही ४५ धावा केल्या.

गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स
भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने या सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली. त्याने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.

सारांशचीही कामगिरी अष्टपैलू राहिली. त्याने भारतासाठी पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तो गुरनूरनंतर भारतासाठी दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

Comments are closed.