भारताकडून पदार्पणाची खुशखबर वैभव सूर्यवंशीने सर्वात आधी कोणाला सांगितली? पाहा व्हिडिओ
भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी 4 जुलै 2026 हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अवघ्या 15 वर्षे 99 दिवस वयात पदार्पण करत त्याने सचिन तेंडुलकर यांचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्माच्या हस्ते वैभवला पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. बीसीसीआयने (BCCI) या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. कॅप स्वीकारल्यानंतर वैभवने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. भारताकडून खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
वैभवने सांगितले की, त्याला पदार्पणाची माहिती मिळताच तो थेट आपल्या खोलीत गेला आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या वडिलांना ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर त्याने आईला आणि त्याच्या प्रवासात नेहमी साथ देणारे रोमी भिंदर यांनाही ही माहिती दिली. रोमी भिंदर यांनी त्याला शुभेच्छा देताना, “नेहमीप्रमाणेच निर्भयपणे खेळ. कोणताही दबाव घेऊ नकोस आणि स्वतःच्या खेळावर विश्वास ठेव,” असा सल्ला दिला.
पदार्पणाची कॅप देताना तिलक वर्माने वैभवचे अभिनंदन करत म्हटले, “हा तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. ही कॅप तू तुझ्या मेहनती आणि प्रतिभेच्या जोरावर मिळवली आहेस. निर्भयपणे खेळ, योग्य वृत्ती ठेव आणि अशी कामगिरी कर की प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान वाटेल. कॅप क्रमांक 122, वैभव सूर्यवंशी, तुला खूप खूप शुभेच्छा.”
पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत 14 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकारांचा समावेश होता. फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही त्याने 1 झेल घेत संघाच्या कामगिरीत मोलाची भर घातली.
Comments are closed.