फ्लॅटमधील गळतीला सोसायटी जबाबदार नाही; राज्य सहकारी अपिलीय न्यायालयाचा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इमारतीच्या विविध फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणी गळतीच्या समस्येसंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अर्थात हाउसिंग सोसायटीच्या सदस्याच्या फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणी गळतीला हाउसिंग सोसायटीला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा राज्य सहकारी अपिलीय न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. अशाप्रकारचे वाद प्रामुख्याने बाधित मालमत्तेचा मालक आणि ज्या फ्लॅटमधून पाणी गळती सुरू होते वा पाणी झिरपते, त्या फ्लॅटच्या मालकामध्ये असतात, असे मानले जाते, अशी सहकारी अपिलीय न्यायालयाने दिली आहे.

मीरा रोड येथील राज एक्सोटिका सहकारी गृहनिर्माण संस्थेविरुद्ध दोन दुकानदारांनी अपील दाखल केले होते. संबंधित दुकानदारांचे अपील फेटाळताना अपीलीय न्यायालयाने अंतरिम दिलासा नाकारणाऱ्या ठाणे सहकारी न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला. हा निर्णय देताना अपिलीय न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. गृहनिर्माण सोसायट्या केवळ सामायिक जागा आणि पायाभूत सुविधांसाठी जबाबदार आहेत. खाजगी मालकीच्या फ्लॅटमधील अंतर्गत प्लंबिंग किंवा बाथरूमसाठी हाउसिंग सोसायटीला जबाबदार धरता येणार नाही, असे अपिलिय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. सपतनेकर यांनी निकालपत्रात म्हटले आहे. फ्लॅटमधील विविध तांत्रिक चुकांवरून हाउसिंग सोसायटीला जबाबदार धरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय हाउसिंग सोसायट्यांसाठी मोठा दिलासा आणला जात आहे.

दुकानमालक सरोजकुमार गुप्ता व विनोदकुमार गुप्ता यांनी आरोप केला की, प्रतिमा श्रीवास्तव यांच्या मालकीच्या फ्लॅट क्रमांक १०३ मधून होणाऱ्या गळतीमुळे मार्च २०२२ पासून त्यांच्या तळमजल्यावरील दुकानाचे नुकसान झाले आहे. वरच्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी वारंवार केलेल्या विनंत्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले, असा दावा करीत त्यांनी दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये आणि एकतर दुकानाचे तात्काळ नूतनीकरण किंवा दुरुस्ती खर्चापोटी १ लाख रुपये जमा करावेत, अशा अंतरिम निर्देशांची मागणी केली होती. त्यांची विनंती सहकारी अपिलीय न्यायालयाने अमान्य केली.

Comments are closed.