हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी, पोलीस भरती परीक्षेत 85 प्रश्न खासगी प्रश्नसंचातून कॉपीपेस्ट
राज्यात कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना आता राज्य राखीव पोलीस बल भरतीच्या परीक्षेत ‘महाराष्ट्र पब्लिकेशन’ या खासगी प्रश्नसंचातील तब्बल 85 प्रश्न जशास तसे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे परीक्षेच्या गोपनीयतेवरच ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले असून प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
‘एसआरपीएफ’ गट-5 साठी दौंड येथे 2 मे रोजी राज्य राखीव पोलीस दलाची ही लेखी परीक्षा पार पडली. यामध्ये खासगी कोचिंगच्या सराव प्रश्नसंचातील प्रश्न कोणताही बदल न करता वापरण्यात आले. प्रश्नपत्रिका तयार करताना इतर प्रकाशकांच्या पुस्तकांतील प्रश्नांची खातरजमा न करता ही प्रश्नपत्रिका तयार केल्याचे सांगण्यात येत असले तरी यामध्ये ‘गडबड-घोटाळा’ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. मात्र यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
प्रकाशक म्हणतात, चौकशीसाठी तयार!
– ज्या कोचिंग क्लासच्या पुस्तकातील प्रश्न परीक्षेत आले आहेत त्या ‘महाराष्ट्र पब्लिकेशन’चे संपादक ज्ञानेश्वर बांगर यांनी या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसून आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
– ‘पोलीस भरती 2026 – 50 प्रश्नपत्रिका संच’ असे या पुस्तकाचे नाव असून विठ्ठल बडे या पुस्तकाचे लेखक आहेत. याआधीदेखील काही प्रश्न भरती परीक्षेत आले आहेत. मात्र आताच्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही.
अखेर भरतीला स्थगिती
प्रसारमाध्यमात या प्रकारावर प्रचंड टीका होऊ लागल्याने अखेर राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र, पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 5, दौंड यांनी पुढील आदेश येईपर्यंत या भरतीला स्थगिती दिली आहे.
सखोल चौकशी करा – सुप्रिया सुळे
आयुष्यातील अनमोल वर्षे ही मुले स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खर्ची घालतात. त्यामुळे ही परीक्षा निःपक्ष आणि संशयविरहित होणे गरजेचे आहे. मात्र दौंडमधील या प्रकारामुळे शासकीय नोकरीसाठी जीवतोड मेहनत करणाऱया प्रामाणिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.”
Comments are closed.