पुण्यात अजूनही अनेकांनी एचएसआरपी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत; आकडेवारी सविस्तर वाचा

पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. आता वाहनधारकांना 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी बसविण्याची संधी मिळणार असून त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. 1 एप्रिल 2019 पूर्वी राज्यात नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पुणे शहर व परिसरातील लाखो वाहनांना अद्याप एचएसआरपी बसविण्यात आलेले नाही, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. वाहनधारकांचा प्रतिसाद कमी असल्याने मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वाहनधारकांनीही स्लॉट मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.
दरम्यान, १ जुलैपासून वाहतूक पोलिस आणि वाहतूक विभागाकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : कोल्ह्याने दत्तक घेतलेले गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा 'रस्ता रोको'चा इशारा
63 टक्के वाहने बसवायची आहेत
पुणे शहरातील 25 लाखांहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. गेल्या दीड वर्षात नंबरप्लेट बसविण्याची मुदत पाच वेळा वाढवण्यात आली. तरीही आतापर्यंत केवळ 11 लाख 34 हजार 684 वाहनधारकांनी 'एचएसआरपी'साठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 32 हजार 108 वाहनधारकांना नंबरप्लेट लावण्यास मुदत देण्यात आली आहे, तर 9 लाख 30 हजार 269 वाहनधारकांनी नंबर प्लेट लावल्या आहेत. आजही ६३ टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बाकी आहे.
वाहन मालकांनी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी आणि शक्य तितक्या लवकर HSRP नंबर प्लेट्स बसवाव्यात.
– स्वप्नील भोसले (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.)
हेही वाचा: लातूरमध्ये मध्यरात्री भीषण आग, धावपळ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले
Comments are closed.