शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?

स्टॉक मार्केट क्रॅश मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेलं व्यापार युद्ध, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून करण्यात येत असलेली विक्री, सप्टेंबरच्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेसंदर्भातील जीडीपीमधीच्या वाढीचा मंदावलेला वेग यासह इतर कारणांमुळं भारतीय शेअर बाजारात खळबळ माजली आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमणात घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून केली जाणारी विक्री हे बाजार कोसळण्याचं प्रमुख कारण आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 88139 कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळं भारतीय गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालंय. गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स 2200 अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. यामुळं गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी रुपये गमावले आहेत.

बीएसईचं बाजारमूल्य घटलं

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पैसे काढून घेतल्यानंतर मिडकॅप, स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झालीय. एसआयपी गुंतवणूकदार देखील धास्तावलेले असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या पाच दिवसांमध्ये बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 18 लाख 63 हजार 747 कोटी रुपयांनी घटलं आहे. मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी बिझनेस टुडे यांनी म्हटलं की आगामी कालात सरकारी खर्चात कपात होण्याची शक्यता असल्यानं आणि नकारात्मक उत्पन्नामुळं बाजारातील वातावरण योग्य नाही. गुंतवणूकदार शेअर बाजारातील चढ उतार सुरु असल्यानं शेअर विक्री करत आहेत, असंही ते म्हणाले.

मंगळवारी भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स 1018.20 अंकांनी घसरुन 76293.60 अंकांवर बंद झाला. म्हणजेच दिवसभरात सेन्सेक्स 1.32 टक्क्यांनी घसरला. तर, निफ्टी 309.80 अंकांनी घसरुन 23071.80 अंकांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सुरु असलेल्या विक्रीच्या सत्रामुळं सेन्सेक्समध्ये एकूण 2290 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी मध्ये 667.45 अंकांची घसरण झाली आहे. यामळं गुंतवणूकदारांना 18 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

शेअर बाजारात घसरण कोणत्या कारणांमुळं होतेय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं व्यापार युद्धाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळं महागाई वाढू शकते.

अमेरिकेची सत्ता स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली. यामुळं शेअर बाजार अस्थिर झाला.

एकीकडे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे, तर दुसरीकडे भारताच्या रुपयामधील घसरण सुरु आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर होतोय.

फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरांमध्ये कपात केल्यानंतर गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत.

भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदार त्यांचे समभाग विकत आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होतं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर बातम्या :

SIP Investment :…तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा ‘तो’ निर्णय ठरेल चुकीचा…

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.