शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने होते.
सेन्सेक्स 472 अंकांनी वधारला, दिवसभर चढ-उतार, रुपया वधारला
वृत्तसंस्था, मुंबई
शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात सोमवारी सकारात्मकतेसह झाली. अर्थात सकाळी बाजार वधारला, मधल्या टप्प्यात पुन्हा घसरला व अखेरच्या 20 मिनीटात पुन्हा बाजारात खरेदी परतली. शेवटी सेन्सेक्स 472 अंकांनी तर निफ्टी 133 अंकांच्या वाढीसोबत बंद होत बाजाराचा शेवट गोड झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 472 अंकांनी वाढून 72,382 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 133 अंकांनी वाढून 22,555.75 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 263 अंकांच्या वाढीसोबत 54714 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक हलक्या घसरणीसह बंद झाला. स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास एफएमसीजी क्षेत्राने सर्वाधिक वाढ नोंदवली. एफएमसीजी निर्देशांक 789 अंकांनी वाढत 44,579 अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 0.97 टक्के वाढून 8,015.10 वर बंद झाला. माध्यम आणि वित्तीय क्षेत्रांनीही बाजाराला आधार दिला. या पाठोपाठ ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, ऑईल व गॅस, रियल्टी या क्षेत्रांची कामगिरी सकारात्मक राहिली होती.
समभागांची कामगिरी
विविध समभागांची कामगिरी पाहिल्यास आयटीसी, टाटा मोटर्स पीव्ही, श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल, इटर्नल, एनटीपीसी, अदानी पोर्ट, टीसीएस, विप्रो, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, लार्सन टुब्रो, ओएनजीसी, टायटन, टीसीएस, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प, बीईएल, ग्रासिम, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, इंडिगो, जेएसडब्ल्यू स्टील, एचयुएल, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, कोल इंडिया, एसबीआय यांचे समभाग मजबूत होत बंद झाले. तर दुसरीकडे बाजारात सोमवारी महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज ऑटो, जियो फायनान्स, डॉ. रे•िज लॅब्ज, सिप्ला, एचडीएफसी लाइफ, नेस्ले, एचसीएल टेक, मॅक्स हेल्थकेअर, एशियन पेंटस्, इन्फोसिस, कोटक बँक, अपोलो हॉस्पिटल, हिंडाल्को, टाटा कंझ्युमर, सन फार्मा, एसबीआय लाइफ यांचे समभाग घसरत बंद झाले.
जागतिक बाजारात तेजी
जागतिक बाजारात दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.46 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 2.40 टक्के व हाँगकाँगचा हँगसेंग 0.28 टक्के तेजीत होता. 2 ऑक्टोबरला अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.49 टक्के, नॅसडॅक 1.19 टक्के व एस अँड पी 500 निर्देशांक 0.73 टक्के तेजीसह बंद झाले होते.
Comments are closed.