भारत-जपान ऐतिहासिक टी20 सामन्यावर वादळाचे सावट; मुसळधार पावसाचा इशारा

भारत आणि जपान यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यावर आता खराब हवामानाचे सावट पसरले आहे. जपानमध्ये दाखल झालेल्या शक्तिशाली ‘डुजुआन’ चक्रीवादळाने परिस्थिती बिकट केली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे भारतीय संघाला सामन्याच्या एक दिवस आधीचे आपले सराव सत्र रद्द करावे लागले. अशा परिस्थितीत (22 सप्टेंबर) रोजी साणो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या विशेष सामन्याच्या आयोजनाबाबत चाहत्यांची चिंता वाढली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जपानविरुद्ध एकमेव टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा आहे. पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही देशांमधील ही पहिलीच समोरासमोरील लढत असणार आहे. या सामन्याला ‘सुझुकी कप’ असे नाव देण्यात आले असून, भारत-जपानच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याचे आयोजन केले जात आहे. मात्र, सामन्यापूर्वीच हवामानाने भारतीय संघाच्या तयारीमध्ये अडथळा निर्माण केला आहे.
(21 सप्टेंबर) रोजी ‘डुजुआन’ चक्रीवादळ जपानच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत होते. याच्या प्रभावामुळे कांतो भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. जपान हवामान खात्यानेही इशारा दिला आहे की, चक्रीवादळ जवळ आल्यावर परिस्थिती वेगाने बिघडू शकते. ॲक्यूवेदर (AccuWeather) च्या अहवालानुसार, (22 सप्टेंबर) रोजी साणो शहरात दिवसा 83 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारत-जपान ऐतिहासिक सामन्यापूर्वी चाहते आणि आयोजकांची धाकधूक वाढली आहे.
विशेष म्हणजे, पूर्व जपानच्या अनेक भागात आधीच मुसळधार पाऊस झाला आहे. इजू बेट समूह आणि प्रशांत किनाऱ्याला लागून असलेल्या काही भागांत 19 सप्टेंबरपासून 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने येत्या काळात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कांतो आणि मध्य जपानमध्ये सतत पाऊस पडणाऱ्या पट्ट्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, ज्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
या चक्रीवादळाचा फटका आशियाई खेळांनाही बसला आहे. खराब हवामानामुळे सोमवारी घोडेस्वारीशी संबंधित सामने पुढे ढकलावे लागले, जे आता (22 सप्टेंबर) रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे. याशिवाय जपानमध्ये (21) सप्टेंबर रोजी किमान 275 उड्डाणे रद्द करण्यात आली, तर सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला.
भारत-जपान सामना हा भारतीय संघासाठी आशियाई खेळांपूर्वीचा शेवटचा सराव सामना आहे. भारतीय संघ 28 सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून थेट उपांत्यपूर्व (Quarter-Final) फेरीत मैदानात उतरेल. भारताने गेल्या वेळी आशियाई खेळांमध्ये टी20 क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले आहे आणि सध्याचा भारत टी20 जागतिक विजेताही आहे. अशा स्थितीत जपानविरुद्धच्या या सामन्याबाबत संघ आणि चाहते दोघांचेही लक्ष आता हवामानाकडे लागले आहे
Comments are closed.