होर्मुझमध्ये पुन्हा रणकंदन; दोन जहाजांवर गोळीबार, आमच्या परवानगीशिवाय प्रवेश नाही, इराणची स्पष्ट भूमिका

फाइल फोटो

इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे आणि ती तात्काळ बंद केली आहे. यामुळे आखाती देशात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण आहे. या नाकेबंदीमुळे समुद्रात जहाजांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आला आहे.

इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यापारी जहाजाला आता आयआरजीसी नौदलाकडून परवानगी घ्यावी लागेल. इराणच्या या आक्रमक पावलामुळे अमेरिकेसोबतचा तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होत आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा लष्करी नियंत्रण कडक केले असून, त्यामुळे जलवाहतुकीवर निर्बंध आले आहेत आणि जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. होर्मुझकडे जाणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या लष्करी उपस्थितीमुळे धोक्याचे संकेत मिळत आहे.

टँकर ट्रॅकर्स या सागरी ट्रॅकिंग सेवेने दिलेल्या वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करत असताना किमान दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आला. ही एक अत्यंत चिंताजनक बातमी आहे, कारण यामुळे तेलवाहू जहाजे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीने १६ एप्रिल रोजी गुरुवारी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात स्वतंत्र युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली. यानंतर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी थोड्या काळासाठी खुली केली होती. शनिवारी, आठ तेलवाहू जहाजांचा ताफा या मार्गावरून गेला. अनेक जहाज मालकांना आशा होती की या युद्धविरामाचा उपयोग करून ते आपली जहाजे रिकामी करू शकतील. तथापि, आखातात पोहोचल्यावर अनेक जहाजे मागे फिरताना दिसली, यावरून हा मार्ग अजूनही पूर्णपणे खुला झालेला नाही हे दिसून येते.

इराणने अमेरिकेच्या नाकेबंदीला समुद्री चाचेगिरी आणि लुटारूपणा म्हटले आहे. इराणचे म्हणणे आहे की, अमेरिका त्यांच्या जहाजांना जाण्यापासून रोखत असल्यामुळे इराण देखील इतर देशांच्या जहाजांना रोखत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (IEA) म्हटले आहे की, हे इतिहासातील सर्वात मोठे तेल पुरवठा संकट आहे. दररोज १० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल अडकून पडले आहे. गॅस पुरवठा २० टक्क्यांनी कमी झाला असून त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींवर होत आहे. आता या दोन्ही देशांच्या भूमिकेमुळे आखातात तणाव वाढला आहे.

Comments are closed.