12 षटकांत 122/3… तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण ‘व्हिल
DC vs RCB स्कोअर IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 26 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान बंगळुरूने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला खरा, पण शेवटच्या टप्प्यात त्यांच्या फलंदाजीची गाडी अशी काही रुळावरून घसरली की चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. एकेकाळी 200 पार जाईल असे वाटणारे आरसीबीचे धावफलक निर्धारित 20 षटकांत केवळ 175 धावांवर स्थिरावले.
सुरुवात झंझावाती, शेवट मात्र निराशाजनक (DC vs RCB Score IPL 2026)
चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर आरसीबीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. फिल सॉल्टने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 63 धावांची तुफानी खेळी केली. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 12 षटकांच्या अखेरीस आरसीबीची स्थिती 3 बाद 122 अशी भक्कम होती. त्यावेळी आरसीबी सहज 210-220 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. टिम डेव्हिडने सुद्धा 17 चेंडूंमध्ये 26 धावा करून डावाला गती देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही.
शेवटच्या 5 षटकांत काय घडलं? (DC vs RCB Score IPL 2026)
आरसीबीच्या डावातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट शेवटची पाच षटके ठरली. डेथ ओव्हर्समध्ये जिथे धावांचा पाऊस पडणे अपेक्षित असते, तिथे आरसीबीच्या फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये बंगळुरूला केवळ 29 धावा जोडता आल्या. टी-20 क्रिकेटमध्ये, विशेषतः चिन्नास्वामीसारख्या लहान मैदानावर, ही आकडेवारी धक्कादायक आहे.
कोण ठरलं ‘व्हिलन’? (DC vs RCB Score IPL 2026)
या खराब कामगिरीत मधल्या फळीतील फलंदाज जितेश शर्माची खेळी चर्चेचा विषय ठरली आहे. जितेशने 20 चेंडू खेळून काढले, पण त्याला केवळ 14 धावाच करता आल्या. ज्या वेळी फटकेबाजीची गरज होती, त्या वेळी चेंडू आणि धावांमधील हे मोठे अंतर आरसीबीला महागात पडले. सोशल मीडियावर चाहत्यांनी जितेशच्या या खेळीवर नाराजी व्यक्त करत त्याला या डावाचा ‘व्हिलन’ ठरवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून लुंगी एनगिडीने आपल्या अनुभवाचा वापर करत दोन बळी घेतले. कर्णधार अक्षर पटेल आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव या फिरकी जोडीने मधल्या षटकांत आरसीबीच्या धावांवर लगाम लावला. या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद करत आरसीबीला मोठे लक्ष्य उभारण्यापासून रोखले. आता 176 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी ही धावसंख्या गाठणे फारसे कठीण नसावे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.