होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यावसायिक जहाजांसाठी खुली; इराणने मोठी घोषणा करत ठेवली अट
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली आहे, मात्र, एका अटीसह ही परवानगी देण्यात येत आहे. येथून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांनी आमच्या नौदलाला सहकार्य केले पाहिजे. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प चीन दौऱ्यावर आहेत आणि आखातातील भू-राजकीय तणाव व ऊर्जा पुरवठा मार्गांबाबत जागतिक चिंता वाढली आहे. त्यामुळे इराणच्या या घोषणेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडे आखाती देशात लष्करी हालचाली वाढल्या असून जहाजे जप्त केल्याच्या आणि इराणी नौदलाकडून पाळत वाढवल्याच्या बातम्या येत आहेत. तथापि, इराणने आता व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आखातातील संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगातील तेल निर्यातीचा आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूचा (LNG) एक मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. कच्चे तेल, विशेषतः आखाती देशातील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत आणि इराकमधून या सामुद्रधुनीच्या मार्गाने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आशिया आणि युरोपमध्ये जाते. होर्मुझमधील तणावामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आखाती देशांमधील भू-राजकीय तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, इराणने एक मोठे निवेदन जारी करून होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थान आपल्या ऊर्जेच्या गरजांपैकी सुमारे ८५% ऊर्जा कच्च्या तेलातून आयात करतो. ती प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशाच्या आयातीच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली असून त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
इराण तणाव कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसत आहे. मत्र, त्याच वेळी त्याला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण ठेवायचे आहे. इराणने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली केली आहे, परंतु अमेरिकेची नाकेबंदी कायम आहे. त्यामुळे अजूनही होर्मुझमधून वाहतुकीबाबत संभ्रम कायम आहे.
Comments are closed.