सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला सुदर्शन घुले याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल. खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, आता सीआयडीकडून पोलीस कोठडीत सुदर्शन घुले याची पुन्हा कसून चौकशी केली जाईल. पोलिसांकडून सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे. या खंडणी प्रकरणांमध्ये सुद्धा सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात अद्याप सुदर्शन घुले याची चौकशी झाली नव्हती म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांची चौकशी झाली आहे. मात्र, सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होते. सध्या सुदर्शन घुलेला केज शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे या प्रमुख आरोपींना पकडण्यात आले आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे. तो बाहेरच्या राज्यात लपून बसल्याचा संशय आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सीआयडी आणि एसआयटी अशा दोन पातळ्यांवर तपास सुरु आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सीआयडीने कोर्टात सांगितले आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या अन्य साथीदारांवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्याप्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे.
https://www.youtube.com/watch?v=x8lyj11okfe
आणखी वाचा
परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, कैलास फडवर गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Comments are closed.